बीड जिल्ह्यात रब्बीची दोन टक्केच पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड  : खरिपात पावसाने ओढ दिल्याने आणि कीड-रोगांच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीचा पाऊसही न झाल्याने बीड जिल्ह्यात रब्बीही धोक्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र तीन लाख १० हजार हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत केवळ ६३३२ हेक्टर (दोन टक्के) क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. खरिपात कडधान्याचा पेरा अधिक असल्याने आणि रब्बीत ज्वारीचा पेरा नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिमी असून यंदा केवळ ३३४.७० मिमी (५०.२३ टक्के) पाऊस झाला आहे. पेरण्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचा उतारा मोठ्या प्रमाणावर घटला. त्यातच कपाशीवर बोंडअळी आणि ऊसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला. दरम्यान, पाऊस नसल्याने माजलगाव आणि मांजरा या मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपला असून सव्वाशेवर लघू प्रकल्पही कोरडेठाक आहेत. नद्या - ओढ्यांसह गाव - पाझर तलवाही कोरडे आहेत. दरम्यान, परतीचा पाऊस न झाल्याने यंदा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पुरता धोक्यात आला आहे.

तीन लाख १० हजार हेक्टर क्षेत्र हे रब्बी हंगामासाठी असते. गेल्या वर्षी यापेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बी पेरण्या झाल्या होत्या. यंदा जूनमध्ये सुरुवातीचे आठ दिवस आणि गणेशोत्सव काळात एक एवढाच पाऊस झाला. त्यामुळे रब्बीच्या पेरण्यासाठी जमिनीत ओल नाही. त्यामुळे केवळ ६३३२ हेक्टर एवढ्याच क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू व करडई अशी पिके घेतली जातात.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर दरम्यान, जिल्ह्यात सिंचनाचे शास्वत स्रोत कमी असल्याने मोजक्या क्षेत्रावर ऊस होतो. तर, नगदी पिके म्हणून खरिपात सोयाबीन, कपाशी पिकांना शेतकरी प्राधान्य देतात. रब्बी हंगामात जनावरांसाठी ज्वारी, मका अशी पिके घेतात. यंदा ज्वारीचा पेरा घटल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com