पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणी

पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणी
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणी

पुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी ओल राहिलेली नाही. त्यामुळे पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू या पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन लाख २३ हजार ६८० हेक्टरवर म्हणजेच १८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जमिनीत पुरेशी ओल नसल्याने अनेक ठिकाणी पिके सुकू लागल्याचे चित्र आहे.

विभागात गेल्या वर्षी याच कालावधीत आठ लाख ७० हजार ९७ हेक्टर म्हणजेच ५० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या क्षेत्रात ५ लाख ४६ हजार ४१७ हेक्टरने घट झाली आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.  

नगर जिल्हयात रब्बी हंगामात ज्वारी पिकाची एक लाख २५ हजार ८५३, गव्हाची १२५३, हरभऱ्याची ८३०५ आणि मकाची १५१९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हलक्या जमिनीतील ओलाव्याअभावी रब्बी ज्वारी पीक सुकू लागले आहे. गहू पिकास ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे त्या ठिकाणचे शेतकरी संरक्षित पाणी देत आहेत. परंतु आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध न झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. हलक्या जमिनीतील हरभरा पीक ओलाव्याअभावी सुकू लागले आहे. त्यामुळे हरभरा पिकाच्या वाढीवर परिणाम होणार आहे. मका पीकही ओलाव्याअभावी सुकू लागले आहेत.  

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील भातपिकाची काढणी सुरू आहे. पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या उत्पादनात सुमारे २५ ते ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यात ज्वारीची ३७ हजार ४२३, गव्हाची १३२०, मकाची ५४१५ आणि हरभऱ्याची ४१६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, शिरूर, खेड, हवेली या तालुक्यांत ज्वारीचे पीक सुकू लागले आहे. मका पीकवाढीच्या अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीची एक लाख ७ हजार ८९७, गव्हाची ३२८३, मक्याची ८१८३ आणि हरभरा पिकाची १६ हजार १७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. मंगळवेढा व सांगोला तालुक्यात ज्वारीचे पीक ओल नसल्यामुळे सुकू लागले असून, वाढ मंदावली आहे. हरभरा, गहू या पिकांच्या पेरण्याही खोळंबल्याचे चित्र आहे.  

जिल्हानिहाय झालेली रब्बी पेरणी, क्षेत्र (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र
नगर  ६,६७,२६० १,३७,०४०
पुणे ३,९१,८९६ ४८, ९६०
सोलापूर ७,२१,८८० १,३७,६८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com