अकोला जिल्ह्यात प्रकल्प भरल्याने रब्बीसाठी मिळणार पाणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः गेल्या दोन वर्षांत प्रथमच अकोला जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब भरले अाहेत. यामुळे येत्या रब्बी हंगामासाठी प्रकल्पांमधून पाणी उपलब्ध होणार अाहे. हे पाणी देण्यापूर्वी जिल्ह्यात असलेले बहुतांश कालवे मोकळे केले जाणार अाहेत. येत्या अाठवड्यात कालवे स्वच्छतेचे काम सुरू होणार अाहे. शुक्रवारी (ता. ७) येथे झालेल्या जलसंधारण कार्यशाळेत कालवा स्वच्छतेसाठी तातडीने यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे अाश्वासन देण्यात अाले अाहे. जिल्ह्याचा जल व मृदसंधारण विभाग यासाठी पुढाकार घेत अाहे.  

गेल्या काही हंगामांसाठी कालवे तसेच पडून असल्याने अनेक ठिकाणी काटेरी झुडपे वाढली आहेत. तसेच काही ठिकाणी कालवे खचले अाहेत. काही ठिकाणी त्यांचे अाकारमानसुद्धा कमी झाले. हे कालवे हंगामात पाणी सोडण्यापूर्वी मोकळे करण्याचे अभियान प्रशासन हाती घेत अाहे. कालवे मोकळे झाल्यानंतर प्रकल्पाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचविण्यास प्रशासनाला सोईचे होणार अाहे.

सुदैवाने या हंगामात जिल्ह्यातील बहुतांश मोठे, मध्यम व लघू असे सर्वच प्रकल्प तुडुंब भरले अाहेत. हे पाणी रब्बी तसेच काही प्रकल्पांतून उन्हाळी पिकांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला अाहे. अकोला जिल्ह्याचा रब्बी हंगामात साधारणतः एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होते. या वर्षी चांगला पाऊस, मुबलक पाणी असल्याने तसेच सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने बहुतांश शेतकरी दुबार पीक घेणार अाहेत. यामुळे रब्बीच्या क्षेत्रातही किमान २५ हजार हेक्टरने वाढ गृहीत धरली जात अाहे.

सध्या सर्वच भागांत जमिनीत मोठा अोलावासुद्धा तयार झालेला अाहे. मुगाची काढणी वेगाने होत अाहे. येत्या काही दिवसांत उडदाचीही काढणी सुरू होईल. त्यापाठोपाठ दिवाळीदरम्यान सोयाबीनचा हंगाम येत अाहे. हे खाली होणारे क्षेत्र रब्बीत प्रामुख्याने हरभरा, अोवा, गहू या पिकांच्या लागवडीखाली येणार अाहे.  

जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा स्थिती (दलघमी, कंसात टक्केवारी)
काटेपूर्णा ८०.४९५ (९३.२१)
मोर्णा  २१.३६ (५१.५१)
निर्गुणा २८.८५ (१००)
उमा ११.६८८ (१००)
दगडपारवा २.५७० (२५.२२)
वान ७३.०८ (८९.१७)
पोपटखेड ०.८१ (७.४७)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com