रब्बीसाठी मिळणार ‘गिरणा’तून पाणी

The rabbi will get water from the 'Girna'
The rabbi will get water from the 'Girna'

भडगाव, जि. जळगाव : रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे. मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठक झाली. त्यात आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रब्बीचे लांबलेले आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. आता जिल्ह्यातील २५ हजार हेक्‍टर क्षेत्र भिजेल. 

गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन केव्हा सुटेल, याकडे गिरणा पटट्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. रब्बी हंगाम सुरू होऊनही आवर्तन सुटत नसल्याने शेतकरी चिंतेत होता. मार्चपर्यंत हे आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने सोडण्यात येतील.

बैठकीला दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील, गिरणा पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता एस. जे. वंजारी, जळगाव पाटबंधारे (प्रकल्प) अधीक्षक अभियंता अनंत मोरे, गिरणा पाटबंधारे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, उपकार्यकारी अभियंता यू. एन. कोळंबे, एरंडोल उपविभागीय अधिकारी अत्तरदे उपस्थित होते.  गिरणा धरण यंदा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. धरणात सध्या १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त जलसाठा आहे.

रब्बीसाठी एका आवर्तनाला साधारण दोन हजार ६००  दशलक्ष घनफूट एवढे पाणी लागते. त्यामुळे तीन आवर्तनांना साधारणतः साडेसात हजार दशलक्ष घनफूट पाणी लागेल. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने सुटू शकतात. 

पूर्वहंगामी कापसासाठी एक आवर्तन सोडा

यंदा खरीप हंगाम चांगला होता. मात्र, परतीच्या पावसाने तो उद्‌ध्वस्त झाला. त्यात गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. मात्र, त्यांना उभारी देण्यासाठी मे महिन्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी एक आवर्तन द्यावे, अशी मागणी गिरणा पटट्यातून होत आहे. रब्बीचे तीन व पिण्यासाठीचे दोन आवर्तन धरून सुमारे आठ हजार दशलक्ष घनफूट पाणी धरणात शिल्लक राहू शकते. त्यामुळे त्याअंगाने विचार करून पूर्वहंगामासाठी एक आवर्तन मिळणे आवश्‍यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com