खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पट

खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पट
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पट

जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती बऱ्यापैकी असून, पेरणी मागील हंगामाच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. मागील हंगामात खानदेशात सुमारे सव्वालाख हेक्‍टरवर पेरणी झाली होती. तर यंदा तीन लाख हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.  सर्वाधिक दीड लाख हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. यापाठोपाठ ज्वारीची सुमारे ६० हजार हेक्टरवर, मक्‍याची ६५ हजार हेक्‍टरवर आणि गव्हाची सुमारे ४० हजार हेक्‍टर क्षेत्रात पेरणी झाल्याची माहिती आहे. मक्‍याची लागवड मागील आठवड्यापर्यंत सुरू होती. तसेच बाजरीची पेरणी अजूनही सुरू आहे. या आठवड्याच्या अखेरीस बाजरी पेरणीची अंतिम माहिती समोर येईल. कांद्याचीदेखील सुमारे आठ हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. मागील हंगामात कांद्याची फक्त साडेचार हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. तर हरभऱ्याची सुमारे ७५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. मक्‍याची सर्वाधिक सुमारे ४५ हजार हेक्टरवर लागवड जळगाव जिल्ह्यात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.  यंदा धुळ्यातील पांझरा, अनेर, बुराई, मालनगाव, जामखेडी आदी प्रकल्प १०० टक्के भरले. तसेच जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, हतनूर, अंजनी, आदी प्रकल्पदेखील १०० टक्के भरले. यामुळे या प्रकल्पांमधूनदेखील रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन मिळाले आहे. गिरणा धरणातून मागील पंधरवड्यात आवर्तन सोडण्यात आले. तसेच अनेर, पांझरा प्रकल्पातूनही आवर्तन सोडण्यात आले आहे. गिरणा धरणाच्या माध्यमातून सुमारे २५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील रब्बीला सिंचनाचा मोठा आधार झाला आहे.  रब्बी हंगामाची स्थिती जमिनीतील वाफसा चांगला राहिल्याने जोमात आहे. कोरडवाहू ज्वारीमध्ये दाणे भरू लागले आहेत. नोव्हेंबरच्या अखेरीस पेरणी केलेल्या गव्हामध्ये निसवण झाली असून, पीक जोमात आहे. हरभऱ्याला घाटे लागले आहेत. काही ठिकाणी घाटे अळीचा प्रकोप अधिक असल्याने त्यावर सतत फवारणी घ्यावी लागत आहे. गव्हात तण वाढल्याने त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी तणनाशकांचा वापरही करीत आहेत. मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी कामगंध सापळे, कीडनाशकांची फवारणी आदी कार्यवाही करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com