रब्बी पिकांसह फळबागांना फटका

राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावली असून, या पावसाचा पिकांना फटका बसणार आहे.
Rabi crops hit orchards
Rabi crops hit orchards

पुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावली असून, या पावसाचा पिकांना फटका बसणार आहे. सतत ढगाळ वातावरण असल्याने रब्बीच्या हरभरा, गहू, कांदा, ज्वारी, तूर आदी पिकांसह फळपिके आंबा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, काजू, डाळिंब आदी पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा बागायतदार धास्तावले आहेत. चिपळूण, रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा दणका बसला. नुकतीच बागांवर फवारणी केली असल्याने आता पुन्हा फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे फळबागा मालकांना याचा फटका बसणार आहे. 

तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, नगर, सातारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. नगर जिल्ह्यात कोपरगाव परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर अन्य ठिकाणी पावसाला जोर नव्हता. तर सातारा जिल्ह्यात ही हलक्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पुणे जिल्ह्यात दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, हवेली तालुक्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील भात पट्ट्यात ऐन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने नुकसान झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यात नाशिक, सिन्नर, सटाणा, दिंडोरी, चांदवड, कळवण, पेठ, सुरगाणा, इगतपुरी मालेगावसह नांदगाव, येवला तालुक्यांत झालेल्या पावसामुळे अडचणी वाढल्या आहेत. या पावसाचा फटका प्रामुख्याने पूर्वहंगामी द्राक्ष, डाळिंब व कांदा पिकाला बसणार आहे.

मराठवाड्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. औरंगाबाद तालुक्‍यात तुरळक पाऊस झाला. गवळीशिवरा, गंगापूर, कायगाव, नागद, आमठाणा, जायकवाडी, ढोरकीन, शिवूर, आळंद आदी ठिकाणी पावसाची थोडी भूरभूर होती. तर जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण पहायला मिळाले.

पाऊस, ढगाळ हवामानाचा पिकांना धोका द्राक्ष  बऱ्याच बागांमध्ये प्रीब्लूम, फुलोरा आणि मणी सेटिंग नंतरची अवस्था आहे. पावसामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत दाट कॅनॉपी असल्यास फळकूज, मणीगळ, डाऊनी मिल्ड्यू व भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.  डाळिंब  हस्त बहरातील बागेत सध्या फुलधारणा झाली आहे. जोराचा पाऊस झाल्यास फूलगळ होऊ शकते. अर्ली बहरातील बागेत सेटिंग झाले आहे. या परिस्थितीत ढगाळ वातावरण कायम राहिल्यास बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आंबा, काजू  पावसाळी वातावरणामुळे आंबा आणि काजू पिकावर कीड, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसानंतर वातावरण ढगाळ राहिल्यास आंब्याच्या पालवी, मोहोरावर तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मोसंबी  सध्याच्या काळात पाऊस पडला तर अंबिया बहराच्या ताणावर व्यत्यय येईल. ढगाळ वातावरण असेच राहिले तर फुलोऱ्याऐवजी नवती फुटण्याची शक्यता आहे. केसर आंबा  ढगाळ वातावरण आणि कमी थंडीमुळे मोहार फुटण्यावर परिणाम झाला आहे. जेथे मोहोर फुटला आहे, त्याची पावसामुळे गळ होऊ शकते. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संत्रा  सध्या ६० टक्के मृग बहर फुटला आहे. सध्याच्या काळात पाऊस झाला तर बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी अंबिया बहराची फळे ठेवली आहेत, तेथे बुरशीजन्य रोगाने फळगळ होऊ  शकते. केळी सध्याचे ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिले तर करपा रोग वाढू शकतो. जोराचा पाऊस झाल्यानंतर बागेत पाणी साचून राहिले तर रोपांची वाढ मंदावते. गहू  ढगाळ वातावरण आणि थंड वारे वाहत असतील तर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. थंडी अचानक वाढल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि थंडी कमी झाली तर पीक वाढीवर परिणाम होईल. हरभरा  सध्या काही ठिकाणी पाऊस झाला असून, नवीन लागवड झालेल्या हरभरा पिकामध्ये पाणी साचून राहिल्यास मुळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.  ज्वारी  सध्याच्या काळात काही भागात ज्वारी वाढीसाठी अनुकूल हवामान आहे. परंतु काही भागांत ढगाळ वातावरणामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com