खानदेशात रब्बी पिकांची मळणी सुरू

जळगाव ः खानदेशात रब्बी ज्वारी, हरभरा या पिकांची मळणी पूर्ण होत आली आहे. उन्हाळ बाजरी व मका पिकाची मळणी सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे.
Rabi crops start threshing in Khandesh
Rabi crops start threshing in Khandesh

जळगाव ः खानदेशात रब्बी ज्वारी, हरभरा या पिकांची मळणी पूर्ण होत आली आहे. उन्हाळ बाजरी व मका पिकाची मळणी सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. 

हरभरा पिकाची मळणी अंतिम टप्प्यात आहे. ही मळणी गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. आगाप पेरणीच्या हरभऱ्याची मळणी गेल्या १५ दिवसांपूर्वीच झाली. परंतु उशिरा पेरणीच्या हरभऱ्याची मळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. कोरडवाहू दादरची मळणीदेखील आटोपली आहे. परंतु नोव्हेंबरच्या मध्यात पेरणी केलेल्या दादर ज्वारीची मळणी सुरू आहे.

दादर ज्वारीची पेरणी खानदेशात जळगावमधील चोपडा, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागात अधिकची झाली होती. तर हरभऱ्याची पेरणी खानदेशात सर्वाधिक झाली होती. सुमारे सव्वालाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली होती. यामुळे हरभरा मळणी सुरूच आहे. दादर ज्वारीची पेरणीदेखील खानदेशात सुमारे ३२ हजार हेक्टरवर झाली होती. यामुळे दादर ज्वारी मळणीदेखील महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून सुरू आहे.

बाजरीची पेरणी जानेवारीत केली आहे. मका लागवड डिसेंबरमध्ये करण्यात आली आहे. मका मळणी एप्रिलच्या मध्यात सुरू होईल. बाजरीची मळणीदेखील एप्रिलअखेर सुरू होईल. मका पिकात कणसांमध्ये दाणे पक्व होत आहेत. तर, बाजरीचेही दाणे भरत आहेत. काही भागात निसवण पूर्ण झाली आहे.

दादर, हरभरा मळणीसाठी मजुरांची गरज अधिक असते. पण मजूरटंचाई असल्याने मळणीवर परिणामदेखील होत आहे. गहू मळणीदेखील आटोपण्याच्या स्थितीत आहे. गहू मळणीसाठी मोठ्या स्वयंचलित हार्वेस्टरचा उपयोग खानदेशात अधिकचा केला जात आहे. 

आदिवासी बांधवांमुळे मजूरटंचाई कमी 

सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी बांधव मळणी, कापणीच्या कामासाठी चोपडा, जळगाव, शिरपूर, शहादा, धुळे, यावल आदी भागात पोचले आहेत. या मंडळीची मोठी मदत या कामात होत आहे. या मंडळीमुळे मजूरटंचाई काहीशी कमीदेखील झाली आहे. स्थानिक मजूर मंडळी कोरोनाचे संकट व इतर कारणांमुळे मळणी, कापणीच्या कामासाठी येत नसल्याची स्थिती आहे. ज्वारी, हरभरा, गहू मळणी पूर्ण झाल्यानंतर बाजरी, मका मळणी सुरू होईल. मे महिन्याच्या मध्यापर्यंत मळणीचे काम सुरू राहील, असा मुद्दाही सांगण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com