हरभरा क्षेत्रात ९७ हजार हेक्टरने वाढ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : खरिपातील सोयाबीन, कापूस या प्रमुख नगदी पिकांचे विविध कारणांनी मोठे नुकसान झाल्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रब्बीतील प्रमुख नगदी पीक असलेल्या हरभरा पिकावर भर दिला आहे.

या तीन जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४४ हजार ९० हेक्टर अाहे. तर प्रत्यक्षात २ लाख ४१ हजार ७७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात ९७ हजार ६८१ हेक्टरची वाढ झाली आहे. बोंड अळीग्रस्त कपाशीचे पीक मोडल्यानंतर शेतकरी हरभऱ्याची पेरणी करत असल्यामुळे क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवार (ता. ९)पर्यंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात रब्बीची एकूण ४ लाख ३५ हजार ३६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा रब्बीच्या वाढ झाली असून, सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३३ हजार ४१५ हेक्टर असताना १ लाख ३८ हजार १८६ हेक्टर (१०३ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात पेरणी अजूनही रखडत चाललेली असून, सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर असताना, १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टरवर (६९.८६ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २६ हजार २९० हेक्टर असताना, १ लाख ३ हजार ३८२ हेक्टरवर (८१.९० टक्के) पेरणी झाली अाहे.

खरिपातील सोयाबीन, कापूस या प्रमुख नगदी पिकांच्या उत्पादनात पावसाचा दीर्घ खंड, कीड रोग आदी कारणांनी मोठी घट अाली अाहे. या तीनही जिल्ह्यांंतील शेतकऱ्यांचा कल रब्बीतील प्रमुख नगदी पीक असलेल्या हरभऱ्याकडे वाढला आहे.

नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५५ हजार ६७० हेक्टर असताना, ९७ हजार १०७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात ५३ हजार ६० हेक्टर क्षेत्र असताना, ७८ हजार १८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात ३५ हजार ३६० हेक्टर क्षेत्र असताना, ६६ हजार ४८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तीनही जिल्ह्यांत एकूण २ लाख ४१ हजार ७७१ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, क्षेत्रात ९७ हजार ६८१ हेक्टरने वाढ झाली आहे. ज्वारी क्षेत्रात ८७,६४२ हेक्टरची घट प्रमुख अन्नधान्य तसेच चारापीक असलेल्या ज्वारीच्या क्षेत्रात ८७ हजार ६४२ हेक्टरची घट झाली आहे. नांदेड जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २९ हजार ७०० असताना, २२ हजार ६८ हेक्टवर, परभणी जिल्ह्यात १ लाख ५९ हजार ८० हेक्टर क्षेत्र असताना, ९१ हजार हेक्टरवर आणि हिंगोली जिल्ह्यात २२ हजार ८१० हेक्टर क्षेत्र असताना, १० हजार ८७९ हेक्टवर ज्वारीची पेरणी झाली अाहे. तीनही जिल्ह्यांत २ लाख ११ हजार ५९० हेक्टर क्षेत्र असताना, १ लाख २३ हजार ९४८ हेक्टवर पेरणी झाली आहे. गव्हाची पेरणी ५९,८९१ हेक्टरवर नांदेड जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३७ हजार ५१० हेक्टर असताना, १४ हजार ८३० हेक्टरवर, परभणी जिल्ह्यात ३० हजार ४८० हेक्टर क्षेत्र असताना, २१ हजार १६६ हेक्टरवर आणि हिंगोली जिल्ह्यात ३२ हजार ५४० हेक्टर क्षेत्र असताना, २३ हजार ८९५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तीन जिल्ह्यांत मिळून गव्हाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५३० हेक्टर असताना, ५९ हजार ८९१ हेक्टवर पेरणी झाली आहे. तेलबियांच्या क्षेत्रात मोठी घट तीन जिल्ह्यांत रब्बीत करडई, सूर्यफूल, जवस, तीळ ही पीके घेतली जातात. करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ५८ हजार २६० हेक्टर असताना, यंदा केवळ ५ हजार ७२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात २ हजार ९४ हेक्टर, परभणी जिल्ह्यात २ हजार १८८ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ४४० हेक्टर करडईचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात सूर्यफूल, तिळाची तर परभणी जवसाची काही क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com