खानदेशात ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला पुन्हा अडसर

 खानदेशात ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला पुन्हा अडसर
खानदेशात ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला पुन्हा अडसर

जळगाव  ः खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता पडलेली नाही. मध्यंतरी तीन-चार दिवस थंडी होती. आता पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले असून, उशिराच्या रब्बी हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत वाढ नोंदविली गेली आहे.  धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील आठवड्यात किमान तापमानाची नोंद १२ अंश सेल्सिअसपर्यंत झाली होती. तर जळगाव येथील कृषी संशोधन केंद्रातही दोन दिवस किमान तापमानाची नोंद १३ अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे. मागील मोसमात खानदेशात किमान तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे चांगले उत्पादनही हाती आले होते. सिंचनासाठी पाण्याची गरजही कमी झाली होती. परंतु यंदा मात्र किमान तापमान फक्त धुळे जिल्ह्यात काही दिवस पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. तर जळगाव जिल्ह्यात मात्र किमान तापमान या मोसमात आत्तापर्यंतदेखील सहा अंश सेल्सिअसखाली आलेले नाही. मध्येच ढगाळ वातावरण तयार होते. यामुळे थंडीचे प्रमाण या मोसमात कमी दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे. मकर संक्रांतीनंतर थंडी वाढली होती. नंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले.  अशीच स्थिती राहिली तर थंडी आणखी कमी होत जाईल. यामुळे रब्बी पिके हवी तशी येणार नाहीत. यातच मका, ज्वारीवर अनेक भागात लष्करी अळी दिसत आहे. अधिक थंडी असली तर ही अळी आटोक्‍यात येवू शकते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मध्यंतरी तापमान घसरू लागताच शेतकऱ्यांनी केळी बागांचे थंडीपासून बचावासंबंधी व्यवस्थापन हाती घेतले होते.  त्यात रात्रीच्या वेळेस सिंचनावर शेतकरी भर देत होते. परंतु थंडी कमी होत असल्याने केळी उत्पादकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. परंतु हरभरा, ज्वारी, उशिरा पेरणीचा गहू आदी पिकांसाठी थंडी अधिक हवी आहे. ही थंडी किमान फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत टिकून राहावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com