चाळीसगाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची स्थिती चिंताजनक

चाळीसगाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची स्थिती चिंताजनक
चाळीसगाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची स्थिती चिंताजनक

मेहुणबारे, ता. चाळीसगाव  ः चाळीसगाव तालुक्यात मागीलवर्षी अतिपावसाने खरिपाची उत्पन्न वाया गेले होते. यावर्षी रब्बी हंगामाच्या शेतकऱ्यांना आशा असताना वातावरणातील बदलावामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम जाणवत आहे. अशातच मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव पुन्हा झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. गहू व हरभरा वगळता इतर पिकांची स्थिती समाधानकारक नसल्याने रब्बी हंगामाच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात यावर्षी सुमारे १७ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांचा पेरा झालेला असून चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा आहे.  चाळीसगाव तालुक्यात २०१८ मध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. ज्यामुळे रब्बी पिकाचा पेरा कमी झालेला होता. यावर्षी अति पावसामुळे खरिपाचे पीक पूर्णतः वाया गेले. २०१९ मध्ये झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी हंगामात २५ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी सद्यःस्थितीत पिकांची स्थिती समाधानकारक नाही. यंदा सर्वाधिक पीकपेरा गव्हाचा असून त्याखालोखाल हरभऱ्याचा पेरा झाला आहे. तालुक्यात चांगल्या पावसामुळे भूजल पातळी वाढली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. या मुबलक पाण्यावर रब्बीचा पेरा वाढला आहे. एकीकडे हे समाधानकारक चित्र असले तरी वातावरणातील बदलत्या हवामानाचा फटका मात्र पिकांना बसत आहे. गेल्या काही दिवसात अचानक वाढणारी थंडी व पडणारे ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे मका व ज्वारी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. पिकांवर पडलेल्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. 

मक्यासाठी अनुदानावर औषध उपलब्ध  मागील वर्षाच्या खरीप हंगामासारखी यंदा मक्यावर लष्करी अळीने थैमान घातले आहे. यामुळे मका पीक हातचे वाया जाते की काय, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुका कृषी कार्यालयाने मका उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर रोग प्रतिबंधक औषधी घेण्यासाठी परवाने उपलब्ध करून दिले आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा सातबारा उतारा व आधार कार्डची झेरॉक्स तालुका कृषी कार्यालयात जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे यांनी केले आहे.

गहू, हरभऱ्याचे उत्पन्न अपेक्षित  तालुक्याचे एकूण क्षेत्र ९१ हजार हेक्टर असून गिरणा पट्ट्यात ३ हजार ५१५ हेक्टरवर गव्हाची तर २ हजार ६३५ हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झाली आहे. यावर्षी सर्वत्र विहिरींना पाणी असल्याने व नालेही वाहत असल्याने गहू व हरभऱ्याची पिके जोमाने उभी आहेत. या दोन्ही पिकांसाठी पोषक वातावरण असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात असले तरी काही भागात वातावरणातील बदलामुळे पिकांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी गहू व हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. उत्पन्न चांगले होणार असले तरी शासनाने शेतकऱ्यांना किमान गहू व हरभऱ्याला तरी हमी भाव द्यावा, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांमधून होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com