पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्या खोळंबल्या

पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्या खोळंबल्या
पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्या खोळंबल्या

पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात परतीचा पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीत ओलावा राहिला नाही. त्याचा परिणाम रब्बी पेरण्यावर झाला असून, रब्बी पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. सध्या पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या तीन लाख ९१ हजार ८९६ हेक्टरपैकी अवघ्या ५७ हजार ७० हेक्टर म्हणजेच अवघ्या १४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची स्थिती आहे.  

यंदा पावसाळ्यात पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत चांगला पाऊस झाला. मात्र, पूर्वेकडील शिरूर, बारामती, दौड, इंदापूर, हवेली, पुरंदर या तालुक्यांत पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. त्याचा परिणाम खरीप पेरण्यावर झाला.

खरीप वाया गेल्याने रब्बी पेरण्यासाठी परतीचा पाऊस होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांचा चांगलाच हिरमोड केला. त्यामुळे रब्बी पेरण्या कराव्या की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. तरीही काही शेतकऱ्यांनी जमिनीत असलेल्या उपलब्ध ओलाव्यावर ज्वारी, हरभरा अशा कमी पाण्याच्या पिकांच्या पेरण्या केल्या. सध्या ही पिके अक्षरशः सुकू लागली आहेत.    

दोन दिवसांपूर्वी बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर भागात कमी अधिक पाऊस झाला; परंतु तो पाऊस पिकांना दिलासा देणारा ठरला असला तरी आगामी काळात पाण्याअभावी पिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीची ४६ हजार ४० हेक्टर, गव्हाची १६५२, मक्याची सहा हजार ४६२, रब्बी तृणधान्याची २१९ तर हरभरा दोन हजार २५५, रब्बी कडधान्य ३४५, तर करडईची ४०, सूर्यफूल ३० इतर गळीतधान्याची ९० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सध्या ज्वारी पेरणीचा हंगाम संपला असून हरभरा, गहू पिकांच्या पेरण्याची काही प्रमाणात शक्यता आहे; परंतु जमिनीत ओल नसल्याने या पिकांच्या पेरण्याही होतील की नाही शाश्वती कमी आहे.

तालुकानिहाय झालेली रब्बी पेरणी ः क्षेत्र, हेक्टरमध्ये ः हवेली ५०२, मुळशी ३२०, भोर १३१३, मावळ १४८, वेल्हे ११२, जुन्नर ४६८०, खेड ६५७०, आंबेगाव ६४७४, शिरूर १०,२६०, बारामती १३,५५८, इंदापूर ३,६५२, दौंड २५४, पुरंदर ९,२२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com