परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी, हरभऱ्याचा पीकविमा मंजूर

परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी, हरभऱ्याचा पीकविमा मंजूर
परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी, हरभऱ्याचा पीकविमा मंजूर

परभणी : गतवर्षी (२०१८-१९) च्या रब्बी हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ६४ हजार २५१ शेतकऱ्यांना ज्वारी आणि हरभऱ्याचा एकूण ९ कोटी ६३ लाख ६१ हजार ७३२ रुपये एवढा विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम जमा केली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गतवर्षीच्या रब्बी हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ९३९ शेतकऱ्यांनी २ लख ४९ हजार २८ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवला होता. एकूण ६१७ कोटी ७७ लाख ९० हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले होते. यामध्ये १ लाख ५३ हजार ३७३ शेतकऱ्यांनी १ लाख ३८८ हेक्टरवरील हरभऱ्यासाठी २३१ कोटी ८९ लाख ८० हजार रुपयाचे विमा संरक्षण घेतले होते. हरभऱ्यासाठी ३ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये एवढा विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला. 

एक लाख ६१ हजार ५०६ शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार १९१ हेक्टरवरील ज्वारीसाठी २७७ कोटी ६८ लाख २ हजार रुपयांच्या रकमेचे विमा संरक्षण घेतले. त्यासाठी ४ कोटी १६ लाख ५२ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला. ३३ हजार ८९२ शेतकऱ्यांनी १६ हजार ५७५.५५ हेक्टरवरील गहू पिकासाठी ५७ कोटी ३५ लाख १४ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेतले. तर ८६ लाख २ हजार रुपये विमा हप्ता भरला. ३९९ शेतकऱ्यांनी २१८.३८ हेक्टरवरील भूईमुगासाठी ८२ लाख ५५ हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले.

त्यासाठी १ लाख २४ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला. ५२ हजार ७६९ शेतकऱ्यांनी २१ हजार ६५४.८३ हेक्टरवरील करडईसाठी ५ कोटी २ लाख २६ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेतले. त्यासाठी शेतकऱ्यांनी ७५ लाख ३ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला.

गतवर्षीच्या कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती होती. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे परभणीतील अनेक मंडळांतील शेतकऱ्यांना ज्वारीची पेरणी करता आली नव्हती. परभणी तालुक्यातील सरासरी क्षेत्राच्या २५ टक्के कमी क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. त्यामुळे पीकविमा योजनेतील नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदीनुसार, परभणी, दैठणा, जांब, पेडगाव, पिंगळी, सिंगणापूर, झरी या सात मंडळांतील शेतकऱ्यांना ज्वारीचा पीकविमा परतावा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिसूचनेव्दारे विमा कंपनीला आदेश दिले होते. त्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्वारीचा ८ कोटी ६२ लाख ६१ हजार ६५८ रुपये एवढा पीकविमा परतावा मंजूर केला होता. 

पीक कापणी प्रयोगातील उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आलेल्या जिंतूर तालुक्यातील बामणी, चारठाणा, मानवत तालुक्यांतील केकरजवळा, पालम तालुक्यातील बनवस, चाटोरी, पाथरी तालुक्यांतील पाथरी, सेलू तालुक्यांतील देऊळगाव, कुपटा, वालूर या मंडळांतील ४० हजार ३६१ शेतकऱ्यांना ज्वारीचा पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला. लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम जमा केली जात आहे. परंतु, विमा कंपनीने मंजूर झालेल्या एकूण परताव्याची माहिती कृषी विभागाकडे सादर केलेली नाही. कुपटा आणि वालूर मंडळांतील ६ हजार ८९६ शेतकऱ्यांना हरभऱ्याचा १ कोटी १ लाख ७४ रुपये एवढा पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com