दुष्काळग्रस्तांसाठी पंतप्रधानांना मुहूर्त सापडत नाही का?
दुष्काळग्रस्तांसाठी पंतप्रधानांना मुहूर्त सापडत नाही का?

दुष्काळग्रस्तांसाठी पंतप्रधानांना मुहूर्त सापडत नाही का?

लोणी, जि. नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी वेळ आहे; मात्र तीव्र दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मुहूर्त सापडत नाही. महाराष्ट्रात टिळक, दाते, ढवळे, रुईकर आणि फडणवीस अशी अनेक पंचांगे उपलब्ध असताना, त्यांना एकही मुहूर्त सापडत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (ता.१८) टीका केली. लोणी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारची कर्जमाफी फसल्याने किमान केंद्राकडून तरी सरसकट कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा आहे; मात्र ती जाहीर करायलाही पंतप्रधानांना मुहूर्त मिळत नाही का? मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने काल कर्जमाफीचा निर्णय घेतला. राजस्थानातही असाच निर्णय काँग्रेसचे सरकार घेणार आहे. त्यांचा आदर्श घेऊन केंद्राने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी; अन्यथा सरकारला पळता भुई थोडी करू.’’ पंतप्रधान येणार, म्हणून कल्याणमध्ये स्मशानभूमी बंद ठेवण्यात आली. केवळ पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी अंत्ययात्रा काढण्यासही बंदी घातल्याची बाब निषेधार्ह आहे. या सरकारने हयातीपासून ते स्मशानभूमीपर्यंत लोकांना छळण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे, असे सांगून विखे पाटील म्हणाले, ‘‘मेट्रोच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रात आलेल्या पंतप्रधानांनी दुष्काळी भागाला भेट द्यायला हवी होती. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात येताना ते शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीचे पॅकेज आणतील, अशी अपेक्षा होती; पण त्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची साधी आठवणही झाली नाही.’’ अंधेरी येथील कामगार हॉस्पिटलला लागलेल्या आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने खरे तर भूमिपूजनाचा हा कार्यक्रमच रद्द करायला हवा होता; पण संवेदना नसलेल्या या सरकारने केवळ श्रद्धांजली वाहून आपली जबाबदारी झटकली. मेट्रोच्या भूमिपूजनाचे निमंत्रणही शिवसेनेला नव्हते. शिवसेनेत यत्किंचितही स्वाभिमान शिल्लक राहिलेला नाही. लाचारांच्या फौजा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भाजपने कशीही वागणूक दिली, तरी ते सरकारमध्ये टिकून राहतील, अशी टीका विखे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com