कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही ः विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील

नगर  ः नगर जिल्ह्यात कृषी विद्यापीठ आहे. येथील शास्त्रज्ञ मात्र विद्यापीठाबाहेर गेलेच नाहीत. त्यामुळे विद्यापीठातील संशोधनाचा शेतकऱ्यांना अजिबात फायदा झालेला नाही. शेतकरी आणि कृषी विद्यापीठाचा तसा सबंधच संपत आला आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.  

जिल्हा परिषदेतर्फे आदर्श गोपालक व प्रगतशील शेतकरी पुरस्काराचे सोमवारी (ता. ७) नगर येथे वितरण झाले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री राम शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी विखे पाटील म्हणाले, की शेतकरी अडचणीत आहेत, दुष्काळाशी सामना करताना त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना फारसा कोणी आधार दिला नाही. कृषी विद्यापीठातून होणाऱ्या संशोधनाचा शेतकऱ्यांना फायदा होणे गरजेचे आहे, मात्र येथे शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने काहीच केलेले नाही. मी विद्यापीठाचे अनुदान कपात करण्याचा निर्णय घेतला तर माझा निषेध केला. चाळीस वर्षांत विद्यापीठावर संशोधनासाठी अब्जावधींचा खर्च करून काय मिळाले, असा प्रश्‍न मी उपस्थित केला.

कृषी विभागात ३२ हजार कर्मचारी आहेत. मी कृषिमंत्री असताना कर्मचाऱ्यांकडून ‘आपल्या प्रयत्नातून किती शेतकरी बदलले’ याबाबत फॉर्म भरून घेण्याचे ठरले होते. आमचे सरकार गेले, पण फॉर्म आलेच नाहीत, असे विखे पाटील यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेचा कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौरा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. सोमवारी झालेल्या कार्यक्रमात २२८ शेतकरी, गोपालकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मात्र, संख्या जास्त असल्याने जागेवरच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप केले गेले.  त्यामुळे दूरवरून आलेल्यांना मात्र मान्यवरांसोबत फोटोचा स्वतंत्र आनंद घेता आला नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com