सर्व संघर्ष माझ्या मुलासाठी उभा राहिला हे चुकीचे : राधाकृष्ण विखे

राधाकृष्ण विखे
राधाकृष्ण विखे

मुंबई ः नगरच्या जागेवरून झालेला सर्व संघर्ष माझ्या मुलासाठी उभा राहिला हे चुकीचे आहे. नगरच्या जागेवर राष्ट्रवादीचा सलग तीनदा पराभव झाला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळाली तर आघाडीची एक जागा वाढेल अशी माझी भूमिका होती. मात्र, नगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नसताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आमचे वडील बाळासाहेब विखे यांच्याबाबत केलेले विधान दुर्दैवी होते, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.  मुलगा सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी (ता. १४) पत्रकार परिषद घेतली. विखे म्हणाले, की माझ्या मुलासाठी हा सर्व संघर्ष उभा राहिला हे मुळात चुकीचे आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांसाठी वाटाघाटी सुरुरू होत्या. यामध्ये काही जागांबाबत अदलाबदलीचा राष्ट्रवादीचा आग्रह होता. यामागे आघाडीच्या ज्या जागा यापूर्वी निवडून आलेल्या नाहीत, त्याबाबत ही चर्चा होती. या चर्चेमध्ये नगरची जागा होती. नगरच्या निवडणुकीत सलग तीन वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसला दिली तर ती निवडून येऊन आघाडीची एक जागा वाढेल अशी आमची भूमिका होती. याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत पुष्कळ चर्चा झाली, यामध्ये योग्य समन्वय घडवून आणायचा आमचा प्रयत्न होता. या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये कुठेही माझ्या मुलाने वेगळ्या पक्षात जावे किंवा तसा निर्णय करावा, अशी माझी भूमिका नव्हती. नगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता, अशा वेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आमचे वडील बाळासाहेब विखे यांच्याबाबत केलेले विधान दुर्दैवी होते. जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही, असे मला वाटते. याचे मला व्यक्तिशः वाईट वाटले. पवारांचे हे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता. त्यामुळे नगरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेवर त्यांना स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही, माझी भूमिका मी हायकमांडपुढे स्पष्ट करीन, असेही विखे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com