कारखान्यांची हवाई अंतराची अट काढा ः रघुनाथदादा पाटील

रघुनाथदादा पाटील
रघुनाथदादा पाटील

पुणे: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी तातडीने देणार नसाल तर दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाका, असा प्रस्ताव शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ठेवला आहे. संघटनेचे आंदोलन मंगळवारी (ता. २९) चौथ्या दिवशी देखील सुरूच होते.  शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी सांगितले, की साखर आयुक्तालयासमोर आम्ही धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्वतः शेतकऱ्यांसमवेत अर्धा तास चर्चा केली. एफआरपी व त्याच बरोबर मागील हंगामातील आरएसएफची पूर्ण देयके शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत आयुक्तालयालने काहीही लेखी आश्वासन दिले नाही. त्यामुळे आमचे आंदोलन सुरूच आहे.  ‘‘कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने सध्या एफआरपी देता येत नाही अशी सबब शासनाकडून सांगितली जाते. त्यामुळे किमान दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट तरी काढून टाका असा प्रस्ताव आयुक्तालयासमोर मांडण्यात आला आहे,’’ असे श्री. आपेट म्हणाले. ऊस दर नियंत्रण मंडळात तत्कालीन सदस्य म्हणून रघुनाथदादांनीच हा प्रस्ताव मांडला होता. तो मंजूर करण्यात आला. मात्र, मंत्री समितीकडून हवाई अंतराची अट १४ किलोमीटरवरून २५ किलोमीटर करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे आयुक्तांनी आता अट पूर्णतः रद्द करण्याचा प्रस्ताव पुन्हा शासनाला पाठवावा, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनात संघटनेचे शिवाजीनाना नांदखिले, बाळासाहेब पठारे, माउली कदम, अनुरथ ताठी, शिवाजी जवरे, गणेश पाटील, विश्वंभर गोरवे, किरण चक्रपाणी व इतर पदाधिकारी सहभागी झालेले आहेत.  कारखान्यांच्या बचावासाठीच पाठिंबा  "राज्यात भाजप सरकारला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी २०७ मते पडली. मुळात भाजपकडे १२२ मते होती. शिवसेनेचे ६३ आमदार मतदानाला आले नाहीत. मात्र, राष्ट्रवादीची ४१ मते आणि कॉँग्रेसची ४२ मते भाजपच्या बाजूने पडली. त्या मोबदल्यात राज्यातील साखर कारखान्यांना हवाई अंतराची अट न लावणे, कारवाई न करणे असे छुपे करार भाजपने केले. त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकरी भोगत आहेत, असा आरोप श्री. आपेट यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com