मोदींनी देशाला बरबाद केलेः राहुल गांधी

राहूल गांधी
राहूल गांधी

औसा, जि. लातूर: मोदी सरकारने काही मोजक्या उद्योगपतींचे साडे पाच लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. कर्ज थकीत राहिले तर शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. यातून कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहे. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. बेरोजगारी वाढली आहे. चंद्रावर यान पाठवून तरुणांचे पोट भरत नाही. मोदींनी देशाला बरबाद केले, अशी टीका काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केली.  राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पहिली सभा लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात  रविवारी (ता. १३) घेतली. या वेळी माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव, काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील (औसा), अमित देशमुख (लातूर शहर), मधुकरराव चव्हाण (तुळजापूर) आदी मान्यवर उपस्थित होते. कसे आहात... तुमचा मुड कसा आहे... बेरोजगारी आहे का... युवकांना रोजगार मिळाला का... शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का... मग अच्छे दिन आले का... असे प्रश्न विचारत गांधी यांनी भाषणाला सुरवात केली. महाराष्ट्रातील रक्तात, हृदयात काँग्रेस भिनली आहे. ती कोणाला बाजूला करता येणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षच जिंकणार, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.  मोदी सरकारने उद्योगपतींचे साडे पाच लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. कर्ज थकीत राहिले तर शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. नोटाबंदी, गब्बरसिंग टॅक्सने (जीएसटी) तर देशाचा सत्यानाश केला. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेला यातून मारण्यात आले. अर्थव्यवस्था उदध्वस्त करून टाकली आहे. आता नुकसान सुरू झाले आहे. येत्या सहा महिन्यांत काय हाल होतील. मोदींनी देशाला बरबाद केले, असे शेतकरी, सर्वसामान्य लोक, युवक म्हणत आहेत. पण मीडियात याबाबत एक शब्दही बोलला जात नाही. बेरोजगारी वाढली, कर्जमाफी केली नाही. हेही मीडियातून सांगितले जात नाही. जनतेचे मुद्दे उचलले जात नाहीत, असा आरोप गांधी यांनी केला.   एकामागून एक कारखाने बंद होत आहेत. ॲटोमोबाईल क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. कपडा उद्योग-हिऱ्यांचा उद्योग बंद पडला. हे काय चालले आहे, समजून घ्या. सत्ताधारी कधी काश्मीरच्या मुद्यावर तर कधी ३७० च्या मुद्यावर बोलतात. पण जनतेच्या मुद्यावर बोलत नाहीत. मोदीजी, शहा हे खऱ्या मुद्यावरून आपले लक्ष विचलीत करून ते दुसरीकडे नेवू पाहत आहेत. हे आताच ओळखले पाहिजे. भारताचा मेक इन इंडिया नाही तर मेक इन चायना झाला आहे, अशी टीकाही गांधी यांनी केली. आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना फसवले. आम्ही फसवणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. फडणवीस सरकार फसवणूक सरकार आहे. विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले नाही. बेरोजगारी वाढवली. कारखाने बंद. त्यामुळे कुठलाच घटक समाधानी नाही. या सरकारला जनता नाकारेल. असे श्री. थोरात म्हणाले. या वेळी श्री. खर्गे, श्री. चाकूरकर, श्री. बसवराज पाटील, श्री. अमित देशमुख यांचे भाषण झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com