उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशान

उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशान
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा कधी राजकीय आखाड्याचा केंद्रबिंदू बनेल याचा नेम नाही. उत्तर प्रदेशात ऊसबिलापोटी शेतकऱ्यांचे १० हजार कोटी रुपये कारखान्यांकडे अडकले आहेत. याच मुद्द्याला हात घालत काँग्रेस, बसप आणि सप या विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. 

उत्तर प्रदेशात लोकसभेचे देशातील सर्वाधिक ८० मतदारसंघ आहेत. येथे सात टप्प्यांत मतदान होत असून, यातील पहिल्या टप्प्यातील ८ जागांसाठीचे मतदान अवघ्या पंधरा (११ एप्रिल) दिवसांवर आले आहे. राज्यातील ऊस उत्पादकांच्या १० हजार कोटी थकीत बिलातील निम्मी रक्कम या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील शेतकऱ्यांची आहे. यामुळे थकीत ऊसबिलाचा प्रश्‍न येथे चांगलाच तापला आहे. 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, विभागीय सरचिटणीस प्रियांका गांधी, बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी याविरोधात चांगले रान उठविले आहे. या तुलनेत राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांचा प्रतिवाद कमी पडत आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणारे देशभक्त कसे? : राहुल गांधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांचा अपमान करणारे देशभक्त कसे असू शकतात, असा सवाल कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि भाजप शेतकऱ्यांची देणी देत नसल्याचा आरोप केल्यानंतर राहुल यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला आहे. ‘तुमचे अपयश हे तुमचेच आहे, याकरिता तुम्ही शेतकऱ्यांना शिक्षा का करत आहेत? आपले शेतकरी आपल्याला जीवन देतात. जे कोणी शेतकऱ्यांचा अपमान करतात ते कधीच देशभक्त असू शकत नाहीत’, असे राहुल यांनी आपल्य फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.  

राहुल यांनी आपल्या फेसबूक पोस्टला माध्यमांचा अहवालसुद्धा ‘टॅग’ केला आहे. ज्यात उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादकांची १० हजार कोटींची देणी बाकी असल्याचा दावा आहे. तसेच यातील निम्मी थकबाकी ही पहिल्या टप्प्यातील निवडणूक परिसरातील असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी मायावतींचा हल्लाबोल लखनौ : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी उत्तर प्रदेश सरकार साखर कारखान्यांवर कारवाई का करत नाही, असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. मायावती म्हणाल्या, ‘‘१० हजार कोटींची थकबाकी असताना उत्तर प्रदेशातील शेतकरी आनंदी कसा असू शकेल? विचार करण्यासारखा हा विषय आहे. शेतकरी विरोधी आणि भांडवलदार प्रेमी सरकारने खोटे दावे करू नये.’’ शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी बसपाच्या सरकारप्रमाणे भाजपचे सरकार साखर कारखानदारांविरोधात कडक भूमिका का घेत नाही, असा सवालही मायावती राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारला केला.  ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कुटुंब न थकता दिवस-रात्र काम करत असते. मात्र, उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांचे थकीत १० हजार कोटी रुपये देण्यासाठी कोणतीही पाऊले उचलताना दिसत नाही. परिणामी या शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, अन्न आणि आरोग्य प्रभावित झाले असून, पुढील पीक घेणेही थांबले आहे. हे चौकीदार फक्त श्रीमंतांसाठी काम करत असून, तो गरिबांची काळजी करत नाहीत. - प्रियांका गांधी, कॉँग्रेस नेत्या ‘‘२०१२-१७ या काळात जेव्हा शेतकऱ्यांची उपासमार होत होती, तेव्हा हे शेतकऱ्यांचे कथित शुभचिंतक कोठे होते? आम्ही जेव्हा सत्तेत आलो तेव्हा ५७ हजार ८०० कोटींची ऊस उत्पादकांची देणी बाकी होती, आम्ही ती दिली. सप आणि बसपच्या राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीच केले गेले नाही, परिणामी उपासमारीने ते मृत्यमुखी पडले. राज्यात ऊस लागवड क्षेत्रात २२ टक्के वाढ होऊन ते २८ लाख हेक्टरपर्यंत पोचले आहे. बंद पडलेले अनेक साखर कारखाने आम्ही सुरू केले. शेतकरी आता समाधानी आहेत. - योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com