बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी विद्यापीठ

मारहाण, वादग्रस्त कुलसचिवाची नियुक्ती व आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने एका कर्मचाऱ्याला केलेली अटक, यामुळे कृषी शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
rahuri university
rahuri university

पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात प्राध्यापकाला झालेली मारहाण, वादग्रस्त कुलसचिवाची नियुक्ती व आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने एका कर्मचाऱ्याला केलेली अटक,  यामुळे कृषी शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.  ‘‘राहुरी विद्यापीठाचे नाव कधी काळी देशभरातील कृषी शास्त्रज्ञांमध्ये आदराने घेतले जात होते. मात्र, कुलगुरू निवडीचा गोंधळ, लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकलेल्या कुलसचिवाची झालेली नियमबाह्य नियुक्ती, बदल्यांमध्ये घातलेला धुडगूस यामुळे संस्थेची प्रतिमा धोक्यात आली. आता तर थेट प्राध्यापकाला मारहाण, लाचखोराला अटक असे प्रकार होवू लागले आहे. त्यामुळे विद्यापीठ धोक्याच्या दिशेने जात आहे,’’ असा इशारा एका ज्येष्ठ प्राध्यापकाने दिला आहे.  कोविड कालावधीत विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्याचे काम समाधानकारक न वाटल्याने त्याच्याकडून पदभार काढून घेण्यात आला होता. यात प्रा. राहुल देसले यांचा संबंध असल्याची चुकीची माहिती या अधिकाऱ्याला कोणी तरी दिली. त्यामुळे प्रा. देसले यांना या अधिकाऱ्याने विद्यापीठाच्या आवारातच बेदम मारहाण केली. ‘‘प्रा. देसले यांना मारहाण झाल्याची घटना खरी आहे. मात्र, त्यात विद्यापीठ प्रशासनाचा दोष नाही. आम्ही उलट पोलिसांना पाचारण केले. हल्लेखोराला अटक तसेच निलंबनाची देखील कारवाई घडली आहे. या प्रकरणाची कुलगुरूंनी गंभीर दखल घेतली आहे,’’ असा दावा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने केला.  दुसऱ्या बाजूला विद्यापीठातील लाचखोरीचा मुद्दाही ऐरणीवर आलेला आहे. बदल्या, कंत्राट वाटप, निवृत्तिवेतन, वैद्यकीय रजा, नियुक्त्या अशा विविध कामांमध्ये अडवणुकीचे प्रमाण गेल्या १० वर्षांत वाढल्याचे कर्मचारी सांगतात. शिस्त आणि प्रामाणिक कामकाज करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नेतृत्वाने वाऱ्यावर सोडल्याने विद्यापीठाला हे दिवस आले, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.  २१ ऑक्टोबरला विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयाचा लिपिक ज्ञानेश्वर काशिनाथ बाचकर याला लाच घेताना रंगेहात पकडल्याचे नगरचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी जाहीर करताच विद्यापीठात खळबळ उडाली. ‘‘विद्यापीठ प्रशासनाचा बट्ट्याबोळ करण्यात एका चौकडीचा हात आहे. आपल्या मर्जीतील कुलगुरू बसवून पुन्हा धुडगूस कसा घालता येईल, यात ही चौकडी गुंतली आहे,’’ अशी हताश प्रतिक्रिया विद्यापीठाच्या एका माजी संचालकाने व्यक्त केली.

प्रतिक्रिया राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांवर कामाचा ताण आहे. अशा स्थितीतही प्रत्येक जण गुणवत्तेने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रा. राहुल देसले हे राहुरी विद्यापीठातील चांगल्या पद्धतीने अध्यापन करीत असताना त्यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत . - प्रा. दिनकर जीवतोडे, अध्यक्ष, कृषी विद्यापीठ संघ

कृषी विद्यापीठात लाचखोरीबद्दल सापळा रचून अटक होणे हे धक्कादायक आहे. शास्त्रज्ञांच्या दिवसरात्र मेहनतीने उभ्या राहिलेल्या या विद्यापीठाची प्रतिमा आम्ही जपली. विद्यापीठात थेट प्राध्यापकाला मारहाण किंवा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या धाडी पडणे असे प्रकार कधीही घडले नव्हते. या पवित्र संस्थेची अशी मानहानी होताना पाहून आम्हा कृषी शास्त्रज्ञांना खंत वाटते. - डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com