परभणी : रेल्वे सेवा बंदचा लिंबू उत्पादकांना फटका

परभणी ः‘कोरोना’ विषाणू संसर्गामुळे रेल्वे सेवा बंद आहे. परिमाणी मुंबई तसेच पंजाब आणि तेलंगणा राज्यात लिंबू पाठविता येत नाहीत. त्यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील लिंबू उत्पादकांचे दररोज ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. शिवाय काढणी न केलेल्या लिंबाची फळगळ होऊन नासाडी होत आहे.
Railway service shut down lemon producers
Railway service shut down lemon producers

परभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गामुळे रेल्वे सेवा बंद आहे. परिमाणी मुंबई तसेच पंजाब आणि तेलंगणा राज्यात लिंबू पाठविता येत नाहीत. त्यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील लिंबू उत्पादकांचे दररोज ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. शिवाय काढणी न केलेल्या लिंबाची फळगळ होऊन नासाडी होत आहे.

परभणी जिल्ह्यातील परभणी तसेच सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लिंबू उत्पादन घेतले जाते. परभणी जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकरी परभणी, सेलू तसेच जालना स्टेशनवरुन दररोज रेल्वेव्दारे पंजाब मधील अमृतसर, लुधियाना या ठिकाणी तेलंगणातील निझामाबाद आणि हैद्राबाद या ठिकाणी तसेच मुंबई येथे ४० ते ५० क्विंटल लिंबू पाठवितात. 

या मोठ्या शहरांमध्ये लिंबांना मागणी असल्यामुळेच चांगले दर मिळतात. परंतु ‘कोरोना’ विषाणूचा संर्सग रोखण्यासाठी रेल्वे सेवा बंद केल्यामुळे राज्यातील तसेच अन्य राज्यातील मोठ्या शहरांमध्ये लिंबू पोचविता येत नाहीत. मार्च, एप्रिल, मे महिन्यात लिंबांना मोठी मागणी असते. त्याठिकाणी प्रतिक्विंटलला दोन ते अडीच हजार रुपये पर्यंत दर मिळतात.

रेल्वे सेवा बंद असल्यामुळे परभणी तसेच नांदेड येथील मार्केटमध्ये लिंबाची आवक वाढली आहे. संचारबंदीमुळे ग्राहकांकडून मागणी नाही. त्यामुळे लिंबाच्या दरात घसरण झाली आहे. फळे काढणी, वाहतूक खर्चाएवढा दर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी लिंबाची काढणी करत नाहीत. परिपक्व झालेल्या लिंबाची फळगळ होऊन नासाडी होत आहे. 

तापमानात वाढ होते तशी लिंबांची मागणी वाढते. परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्याचे दररोजचे ५० ते ६० हजार रुपयांहून अधिक नुकसान होत आहे. रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत मुंबई तसेच पंजाब, तेलंगणा या राज्याध्ये अन्य वाहनाव्दारे लिंबू पाठवणे परवडणारे नाही. त्यामुळे नुकसानीत आणखीनच भर पडणार आहे, असे राधेधामणगाव (ता. सेलू) येथील लिंबू उत्पादक विनायक गोरे यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यापासून लिंबाना मागणी वाढते. अमृतसर येथे दररोज चार क्विंटल लिंबू पाठवित असतो. परंतु सद्यस्थितीत लिंबू विक्रीसाठी अडचणी येत आहेत. काढणी करता न आल्यामुळे आजवर सुमारे चार टन लिंबू पिवळे होऊन जमिनीवर गळून पडले आहेत. मुंजाभाऊ कातोरे, आरळ, ता. वसमत, जि. हिंगोली   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com