अवकाळीचा पिकांना फटका

आंबा नुकसान
आंबा नुकसान

पुणे ः विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी (ता. ४) अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे गहू, ज्वारी, हळद पिकांचे नुकसान झाले. तर आंबा, संत्रा, डाळिंब, लिंबू या फळपिकांना फटका बसला. सोसाट्याचा वारा व गारांमुळे मोठ्या प्रमाणात फळे गळून पडली. दुष्काळात कशीबशी तरलेली पिके हातची गेल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत आले आहेत.  गुरुवारी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील लातूर शहरासह तांदुळजा, येरोळ, औसा, उदगीर, निटूर, जाणवळ, जळकोट, अहमदपूर आदी भागात विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला तर ईट, डोकेवाडी, गिरवली, सोन्नेवाडी येथे वादळी वाऱ्यासह गारा पडल्या. त्यामुळे आंब्याच्या बहार व बारीक कैऱ्या गळून पडल्या. 

जालना जिल्ह्यातील अंबड शहर व परीसरात हलक्या सरी कोसळल्या. जांब समर्थ येथे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शहागड, पिंपळगाव रेणुकाई सह परिसरात वादळामुळे गहू शेतीचे नुकसान झाले तर चारा, भुसा भिजला.  परभणी जिल्यातील सेलू तालुक्यातील हिचकी, राजेधामणगाव, धासाळा, सेलू या गावांमध्ये लिंबू आणि आंबा पिकांचे नुकसान झाले. तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर, अर्धापूर या परिसरांत सोसाट्याच्या वारा सुटून ज्वारी, हरभरा, हळद, आंबा, लिंबू, संत्रा या फळपिकांचे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळंमनुरी, सेनगाव या तालुक्यांत हळदीची काढणी सुरू असताना पिकांचे नुकसान झाले. वाशीम जिल्ह्यात वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडावरील कैऱ्या गळाल्या. हळद काढणी करणारऱ्यांचे मोठे नुकसान झाले नसले तरी गहू सोंगणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.  नगर जिल्ह्यातील श्रींगोदा, कर्जत, नगर तालुक्यात लिंबू, कांदा, आंबा, मोसंबीच्या फळबागा, डाळिंब, संत्रा आणि कलिंगड या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. तसेच चाराटंचाईमुळे सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या छावण्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. नगर तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाले असून, वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तसेच कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखाना परिसरात पावसामुळे ऊसतोडणी कामगांराच्या झोपड्यांचे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील पूर्वेकडील बारामती, शिरूर, दौंड या तालुक्यांत अवकाळी पावसाने काढून ठेवलेला गहू, कांदा झाकण्यासाठी धापपळ झाली असून, आंब्याच्या फळबागेच्या कैऱ्या गळून पडल्या, डाळिंब बागांचे काही प्रमाणात नुकसान झाले. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दानवलेवाडी, गोंदवले खुर्द, धामणी, डंगिरेवाडी येथे डाळिंब, कांदा, आंबा या पिकांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com