मराठवाड्यात पुन्हा पावसाची हजेरी

मराठवाड्यात पुन्हा पावसाची हजेरी
मराठवाड्यात पुन्हा पावसाची हजेरी

औरंगाबाद : पावसाने शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नांदेड, परभणी, हिंगोलीत दमदार पाऊस झाला. यशिवाय लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश मंडळात पावसाने हजेरी लावली. औरंगाबादमधील २७ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. जालन्यातील ३५ मंडळांत हलका ते मध्यम सरी कोसळल्या.  

मराठवाड्यात १ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान सरासरी ३६२.७४ मिलिमिटर पाऊस पडणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात अपेक्षीत पावसाच्या तुलनेत ६८.४ टक्‍के झालेला पाऊस केवळ २४८.२६ मिलिमिटरच पडला. अजूनही बीड जिल्ह्यात अपेक्षीत पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. गत दोन दिवसांत जोर ओसरलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २) दुपारनंतर हजेरी लावली.  

औरंगाबादप्रमाणेच बीड जिल्ह्याकडे पावसाची अवकृपाच दिसून आली. जिल्ह्यातील ६३ पैकी ३० मंडळांत पावसाची हजेरी लागली. १ ते १५ मिलिमीटर दरम्यान या मंडळांमध्ये पाऊस झाला. गेवराई, शिरूर कासार, वडवणीत पावसाचा टिपूसही बरसला नाही. 

लातूर जिल्ह्यातील मंडळांवर पावसाची कृपा समाधानकारक अशी राहिली. जिल्ह्यातील सर्व ५३ मंडळांत पावसाची हजेरी लागली. लातूर तालुक्‍यातील एक दोन मंडळे वगळता पावसाचा जोर थोड कमी होता. औसा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यांतील मंडळांमध्ये मध्यम ते दमदार पावसाची नोंद झाली.  उस्मानाबाद जिल्ह्यातही सर्व ४२ मंडळांत पावसाची हजेरी लागली. १ ते ३८ मिलिमीटरदरम्यान पडलेल्या या पावसाचा जोर लोहारा, उस्मानाबाद, उमरगा तालुक्‍यांत अधिक होता. या तालुक्‍यांधील मंडळांमध्ये २० ते ३८ मिलिमिटर दरम्यान पाऊस झाला. कळंब, भूम, परंडा तालुक्यांत तुरळक ते हलका पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी २७ मंडळांत पावसाची हजेरी लागली. सोयगाव तालुक्‍यातील तीनही मंडळांत १२ ते ५५ मिलिमीटर पाउस झाला. जिल्ह्यातील उर्वरित मंडळात १ ते १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जिल्हानिहाय मंडळांतील पाऊस(मिमी)

परभणी चुडावा ७१ 
हिंगोली कळमनुरी ९२, नादापूर ७८, बाळापूर ६६, वाकोडी ७५, अजेगाव ८० 
नांदेड तुप्पा ६७, वसरणी ६५, लिंबगाव ६७, भोकर ७०, किनवट ७२, इस्लापूर १०५, बोधडी १७३, जलधारा १२९, शिवणी १०७, वानोळा ६६, हदगाव ६५, मनाठा ६५, निवघा ८२, तळणी ८७, आष्टी ६८, हिमायतनगर १०२, सरसम ९६, जवळगाव ८०, मुक्रमाबाद ६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com