नाशिक जिल्ह्यात पावसासह पुराचा जोर ओसरला

जिल्ह्यात पावसासह पुराचा जोर ओसरला
जिल्ह्यात पावसासह पुराचा जोर ओसरला

नाशिक : पावसाचा जोर कमी झाल्याने धरणसाठ्यात जलदगतीने होणारी पाण्याची वाढ मंदावली असून धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात आली असून जनजीवन काहीसे सुरळीत झाले आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी नांग्यासाक्या व माणिकपुंज वगळता सर्व धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला आहे. 

पावसाने सोमवारी (ता. ५) विश्रांती घेतली. पण गोदावरी-दारणेसह विविध नद्यांचा पूर कायम होता. दोन्ही प्रमुख नद्यांचा विसर्ग मोठा असल्याने दारणा व गोदावरी कातजच्या अनेक गावांतील रोहित्र आणि काही वीज केंद्रे पुराच्या पाण्यात आहेत. त्यामुळे वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. परिणामी, अनेक गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. गोदावरी नदीवरील खेडलेझुंगे येथील पूल खचल्याने २५ हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. 

पुरामुळे ताहाराबाद गावाजवळील पूल कमकुवत झाला असून, अवजड वाहनांसाठी तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या मार्गावरील जड आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाणी पातळी अधिक असल्याने लाखलगावजवळील कालवी येथील शेतकरी परशराम काशीनाथ अनवट (४७), शहरातील शिवाजीवाडी घरकुल प्रकल्पामधील रहिवासी संजय एकनाथ वल्हाड (४०) हे नासर्डीच्या पुरात रविवारी दुपारी वाहून गेले. तर फुलेनगर येथील आकाश शिवा लोंढे पुरात सूर मारल्यानंतर पाण्याचा अंदाज न वाहून गेला. गोदाकाठ परिसरातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावांना पाण्याने वेढा दिला होता. सद्य:स्थितीत स्थिती पूर्व पदावर आली आहे.

१७ धरणांतून विसर्ग सुरूच जिल्ह्यात संततधार असल्याने १७ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर पाहता ही सर्व धरणे ओव्हर फ्लो होण्याचीच शक्यता असल्याने त्यांमधील पाणी सोडून पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबले आहे. काश्यपी, गौतमी गोदावरी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. गिरणा धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने हरणबारीपाठोपाठ केळझर आणि चणकापूर धरणही ओव्हर फ्लो झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

एनडीआरएफकडून युद्धपातळीवर काम  पूरपरिस्थितीत अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य एनडीआरएफच्या पथकाकडून करण्यात आले. सोमवारी (ता. ५) दिवसभर निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेड्यात मदतकार्य केल्यानंतर सायंकाळी हे पथक बागलाण तालुक्यातील आरम नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी बागलाणमध्ये दाखल झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com