वादळी पाऊस, गारपीटीचा तडाखा 

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे बाजारपेठा, वाहतूक बंद असल्याने शेतातच अडकलेला शेतमालाला अचानक आलेल्या पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे.
rain
rain

पुणे: कोरोनाच्या टाळेबंदीमुळे बाजारपेठा, वाहतूक बंद असल्याने शेतातच अडकलेला शेतमालाला अचानक आलेल्या पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. शनिवारी (ता.१८) सायंकाळनंतर व रविवारी (ता.२०) पहाटे उस्मानाबाद, लातूर, नांदेड, पुणे, कोल्हापूर, चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. परभणी, साताऱ्यातही हलका हलका पाऊस पडला. गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला, आंबा, द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, खरबूज फळपिकांचे नुकसान झाले. बाजारात पाठवता येत नाही, आणि शेतातही ठेवता येत नाही अशा दोन्ही बाजूने कोंडी झाल्याने बळीराजा चांगलाच कात्रीत सापडला आहे.  उस्मानाबाद शहर परिसरात रविवारी (ता. १९) पहाटे सुमारे पाऊणतास विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. पळसप येथे वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने जीवनावश्यक वस्तू, धान्य पावसात भिजून मोठे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळी तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथे गारपिट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. झाड उन्मळून पडल्याने त्याखाली अडकून चार शेळ्यांचा मृत्यू झाला. तामलवाडी, माळुंब्रा भागातही सायंकाळी जोरदार पाऊस झाला.  लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी (ता. निलंगा) परिसरात झालेल्या वादळी पुर्वमोसमी पावसाने शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथेही गारा, वादळी वारे व त्यात पावसामुळे लाखोंचा फटका बसणार आहे. रब्बी हंगामातील काढणीला आलेली गहू, ज्वारी, हरभरा या पिकाचे, फळबागा आणि भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. औराद शहाजनी परिसरात कमी काळात ५२ मिलीमीटर पाऊस झाल्याने सुमारे दोनशे एकरवरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. किल्लारी (ता. औसा) परिसरालाही पूर्वमोसमीचा फटका बसला आहे.  नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील अनेक गाव शिवारात शनिवारी (ता.१८) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या गारपीटीमुळे कलिंगड, आंबा, भूईमुग, ज्वारी, या फळपिकासंह भाजीपाला, ज्वारी आदी पीकांचे मोठे नुकसान झाले. बिलोली तालुक्यातील चितमोगरा, केरुर, आळंदी, बोरगाव आदी गावांच्या शिवारात अर्धा तास गारपीट झाली. मुखेड तसेच लोहा तालुक्यातील माळाकोळीसह काही मंडळात पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यातील काही भागात हलका पाऊस पडला.  पुणे जिल्ह्याच्या इंदापूर, बारामती, आंबेगाव, जुन्नर, मावळ तालुक्यात शनिवारी (ता.१८) दुपारनंतर वादळी पाऊस पडला. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने गहू, मका, हरभरा, द्राक्षे, आंबा, डाळीब पिकांचे नुकसान झाले. इंदापूरातील शेळगाव, अंथुर्णे, लासुर्णे परिसरात गारांचा पाऊस पडला. द्राक्ष, डाळींब, कलिंगड पिकांना फटका बसला, तर मका पीक भुईसपाट झाले. मळणी यंत्राअभावी काढणी झालेल्या गहू, हरभरा पिकांचेही नुकसान झाले. सातारा जिल्ह्यातील कुक्कुडवाड परिसरात हलका पाऊस पडला.  सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि गारांसह वळवाच्या पावसाने पुन्हा एकदा कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपले. शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. कसबा बावड्यातील राजाराम साखर कारखान्याचा बॉयलर वादळी वाऱ्याने पडला. पावसामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही पिकांना वळवाने आधार दिला, तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली. ऊस, मका, ज्वारीसह इतर पिके जमीनदोस्त झाली. शेंडूर-हादनाळ आसऱ्यासाठी थांबलेल्या घराचे पत्रे उडून गेले, यावेळी भिंतीखाली सापडून तिघे जण जखमी झाले.  चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. रविवारी (ता.१९) पहाटे तीनच्या सुमारास वादळी पाऊस झाला. त्यानंतर गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हयातील भाजीपाला उत्पादकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com