मराठवाड्यातील १७८ मंडळांत पावसाची हजेरी

मराठवाड्यातील १७८ मंडळांत पावसाची हजेरी
मराठवाड्यातील १७८ मंडळांत पावसाची हजेरी

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील १७८ मंडळात सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाची ही हजेरी राहिली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्‍यांतर्गत निधवा व तळणी मंडळात अनुक्रमे ९३ व ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ३९ मंडळांत पावसाची २ ते ५२ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. सिल्लोड तालुक्‍यातील अजिंठा मंडळात ५२ मिलिमीटर, तर औरंगाबाद तालुक्‍यातील चौका, लाडसावंगी, भावसिंगपुरा, चित्तेपिंपळगाव या मंडळांमध्ये २० ते ४५ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, मंठा तालुक्‍यांतील बहुतांश भागात मध्यम ते दमदार पाऊस पडला. २ ते ६४  मिलिमीटरदरम्यान नोंदल्या गेलेल्या या पावसाचा जोर बदनापूर तालुक्‍यातील दाभडी मंडळात सर्वाधिक होता. बीड जिल्ह्यातील ४१, लातूर जिल्ह्यातील २९ मंडळांत पावसाची तुरळक ते हलकी हजेरी लागली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ मंडळात हजेरी लागलेल्या पावसाचा जोर परंडा तालुक्‍यात सर्वाधिक झाला. परंडा तालुक्‍यातील परंडा मंडळात ४०, जेवळा बु. मंडळात ४२, अनाळा मंडळात ३५, सोनारी मंडळात १६, अशु मंडळात २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यात दौलावडगाव, पिंपळा, टकाळशिंगी, मंडळात प्रत्येकी २२ मिलिमीटर, आष्टी मंडळात २५ मिलिमीटर, तर धानोरा मंडळात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अंबाजोगाई व परळी तालुक्‍याकडे पावसाचा थेंबही पडला नाही. नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर थोड अधिक आहे.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, लोहा, किनवट, तालुक्‍यात सरासरी १८ ते २० मिलिमीटर, तर हदगाव तालुक्‍यात सरासरी ४४.८६ व हिमायतनगर तालुक्‍यात ४६.६७ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत औंढा नागनाथ या पाचही तालुक्‍यांमध्ये सरासरी १२.२९ मिलिमीटर ते ३१.८३ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

४२ मंडळात पावसाचा टक्‍का पन्नासच्या आत हिंगोली व लातूरवगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील ४२ मंडळात अजून आजवर अपेक्षीत पावसाच्या तुलनेत ५० टक्‍क्‍यांच्या आतच पाऊस झाला आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील तीन तसेच जालना व बीडमधील प्रत्येकी एका मंडळात अपेक्षीत पावसाच्या तुलनेत २५ टक्‍क्‍यांच्या आतच पाऊस पडला, तर ३७ मंडळांत अपेक्षेच्या तुलनेत २५ ते ५० टक्‍के पाऊस पडला. ७६ मंडळांत ५० ते ७५ टक्‍के, ९४ मंडळांत ७५ ते १०० टक्‍के, तर २०९ मंडळांत शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com