बनावट खतनिर्मिती कारखान्यावर गुणवत्ता नियंत्रण विभागाचा छापा

खत कारखाना
खत कारखाना

नाशिक : केवळ सेंद्रिय खतांच्या उत्पादनाचा परवाना असताना जिल्ह्यातील भेंडाळी (ता. निफाड) येथील बेकायदा विविध प्रकारची बोगस खते तयार करून विक्री करणाऱ्या खतनिर्मिती कारखान्यावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. यात ५० किलो वजन असलेल्या बनावट खतांच्या १६२७ गोण्या जप्त केल्या असून, यात १५ लाख २१ हजार ९०० रुपये किमतीच्या १ हजार ६२७ बोगस खतांच्या गोण्या जप्त करण्यात यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, की निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीज ही कंपनी खतांची निर्मिती करते. या कंपनीला सेंद्रिय खतांच्या निर्मितीचे परवाने आहेत. मात्र ही कंपनी अनधिकृतपणे दोन प्रकारची पोटॅशयुक्त खते व कॅल्शियम- सिलिकॉन अशी खतांची निर्मिती करते. या ठिकाणी सम्राट ॲग्रो इंडस्ट्रीज (भेंडाळी, निफाड) व एन. के. फर्टिलायझर (राहुरी) या कंपन्यांचे उत्पादन होत होते. याबाबत गुणनियंत्रण विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या कंपनीवर छापा टाकला. केलेल्या या कारवाईत भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना या कारखान्याच्या गोडावूनमधून १५ लाख २१ हजार ९०० रुपये किमतीच्या १ हजार ६२७ बोगस खतांच्या गोण्या जप्त करण्यात यश आले आहे.  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी किरण विरकर यांनी सायखेडा पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. कंपनीच्या मालकांविरुद्ध आणि एन. के. फर्टिलायझर अॅण्ड केमिकल, राहुरी यांच्याविरोधात खतनियंत्रण आदेश, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि भा.दं.वि. कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कंपनी एकच, मात्र उत्पादन दोन कंपन्यांचे?  भरारी पथकाने या ठिकाणी छापा टाकला असताना सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीज व एन. के. फर्टिलयझर या दोन कंपन्यांच्या खतांच्या गोण्या आढळून आल्या. या ठिकाणी गोडावूनमध्ये साठविलेल्या आणि तयार होत असलेल्या सुपर फॉस्फेट, पोटॅश यांसारख्या रासायनिक खतांच्या निर्मितीचा आणि विक्रीचा राज्य किंवा केंद्र सरकारचा कोणताही परवाना आढळून आला नाही. या कंपनीत सुपर फॉस्फेटच्या ६१०, प्रसाद मॅक्स पोटॅशच्या १५३, बलवान सिलिकॉनच्या ७५६ आणि सम्राट नॅचरल पोटॅशच्या १०८ अशा एकूण १ हजार ६२७ खतांच्या बॅगा आढळून आल्या. याच खतनिर्मिती कारखान्यात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील एन. के. फर्टिलायझर अॅण्ड केमिकल या कंपनीच्या नावाच्या पोटॅश खतांच्या बॅगांचे उत्पादन आणि पॅकिंग सुरू असल्याचे छाप्यात समोर आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com