अकोला : टोमॅटो पिकात पाणी साचले आहे.
अकोला : टोमॅटो पिकात पाणी साचले आहे.

पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

गेल्या आठ दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 50 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाले असून, शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. -शरद हेंबाडे , मंगळवेढा, जि. सोलापूर
  • मराठवाड्यात सोयाबीनसह मका, कपाशीचे नुकसान
  • विदर्भात कापूस, सोयाबीन आणि धान भिजले
  • खानदेशात कापूस उत्पादक, फळबागायतदार धास्तावले
  • दक्षिण महाराष्ट्रातील ऊस, भातउत्पादक अडचणीत
  • नाशिक जिल्ह्यात फळबागा, भाजीपाला पिके संकटात
  • सततच्या पावसामुळे बटाटा बियाणेही सडू लागले
  • खरिपात तीन लाखांहून अधिक क्षेत्र बाधित
  • पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत कुठे जोरदार तर कुठे अतिवृष्टी होत आहे. काढणीला आलेले सोयाबीन, मूग, उडीदासह कापूस, ज्वारी, बाजरी, द्राक्ष, भात आणि उसाला याचा प्रामुख्याने फटका बसला आहे. दिवाळीसारखा सण तोंडावर असताना चांगल्या उत्पादनाची स्वप्नं पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पीक नुकसानीने पुन्हा पाणी आणले आहे. उत्पादनात यामुळे घट येणार असून, शासनाने तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, खरीप हंगामात पडलेला पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि रोग, किडींचा मोठ्या प्रमाणात पडलेला प्रादुर्भाव यामुळे सप्टेंबरअखेर राज्यातील तीन लाख 13 हजार 472 हेक्‍टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

    यंदा जून महिन्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तयारी करत सरासरीच्या एक कोटी 39 लाख 63 हजार 756 हेक्‍टरपैकी तब्बल एक कोटी 41 लाख 41 हजार 623 हेक्‍टर म्हणजेच 101 टक्के पेरणी केली होती. परंतु जून महिन्यानंतर जुलैमध्ये पडलेला पावसाचा खंड, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि कापूस, तूर, भात या पिकांवर पडलेल्या रोग, किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात 50 टक्‍क्‍यांहून अधिक घट येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगला पाऊस होऊनही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

    अतिवृष्टीमुळे 15 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित यंदाच्या खरीप हंगामात जून ते सप्टेबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी ठिकाणी अतिवृष्टी झाली. सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी असले तरी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांना काही प्रमामात दिलासा मिळाला. परंतु नगर, धुळे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, जळगाव, ठाणे, सोलापूर या आठ जिल्ह्यांतील काही तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे तब्बल 397 गावातील 15 हजार 472 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. बाधित क्षेत्रामध्ये कपाशी, बाजरी, मका, सोयाबीन,डाळिंब, केळी, आंबा, कांदा, बाजरी, ज्वारी, भूईमूग, भात, नागली, कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, भाजीपाला व फुलपिकांचा समावेश आहे.

    रोग, किडींचा 2.98 हेक्‍टरवर प्रादुर्भाव खरीप हंगामात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात वाढीच्या व काढणीच्या अवस्थेत आलेल्या तूर, कापूस, भात पिकांवर रोग, किडींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. त्यासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना सांगितल्या गेल्या असल्या तरी रोग, किडींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला. तरीदेखील रोग, किडी आवाक्‍यात न आल्याने मोठे नुकसान झाले आहे. राज्यात हंगामात शेतकऱ्यांनी कापसाची 42 लाख 6 हजार हेक्‍टरवर पेरणी केली होती. त्यापैकी 483 गावांत दोन लाख पंधरा हजार हेक्‍टर म्हणजेच 5.11 टक्के क्षेत्रावर कीड, रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला.

    त्यापैकी दोन लाख दोन हजार हेक्‍टर म्हणजेच 4.81 टक्के क्षेत्रावर उपाययोजना केल्या असल्या तरी ते आवाक्‍यात आलेले नाही. तुरीची बारा लाख 28 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यापैकी 197 गावांमध्ये 72 हजार हेक्‍टर म्हणजेच 5.86 टक्के क्षेत्रावर रोग, किडींची प्रादुर्भाव आढळून आला. शेतकऱ्यांनी 31 हजार म्हणजेच 2.53 टक्के क्षेत्रावर नियंत्रणात्मक उपाययोजना केल्या असल्या तरी उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्‍यता वर्तविली. भाताचे चौदा लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी 85 गावांत 11 हजार हेक्‍टरवर रोग, किडींचा प्रादुर्भाव आढळून आला. शेतकऱ्यांनी दहा हजार हेक्‍टरवर नियंत्रणात्मक उपाययोजना केल्या असल्या तरी उत्पादनात 50 टक्‍क्‍यांहून अधिक घट येण्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

    पावसाच्या खंडामुळे बाधित क्षेत्राची माहिती नाही यंदा चांगल्या पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी तूर, मूग, सोयाबीन, कापूस, उडीद पिकांची पेरणी केली होती. परंतु जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली होती. विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पिके मोडून टाकली होती.

    मात्र, पुणे विभागात सुमारे सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्र पावसाच्या खंडामुळे बाधित झाल्याचे समोर आले होते. परंतु कृषी आयुक्त स्तरावर या पिकांची कोणतीही प्राथमिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे शासन स्तरावरून भविष्यात देण्यात येणाऱ्या मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याचे चित्र असून कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकरी प्रतिक्रिया

  • खरीप हंगामात कमी कालावधीत एकूण 35 एकरांवर मूग, उडीद, सोयबीनची पेरणी केली. पेरणीनंतर जुलैमध्ये पावसाचा खंड पडला. त्यामुळे वीस एकर क्षेत्र मोडून टाकले; तर 15 एकरांवरील उत्पादनात मोठी घट झाली. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यासाठी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले, परंतु अजून त्यावर कोणताही निर्णय झाला नाही, असे कौलखेड जहागीर (ता. जि. अकोला) येथील मनोज तायडे यांनी म्हटले आहे.
  • मूग, उडीद, तुरीला शेंगा न आल्याने मोठे नुकसान झाले. यंदा कापसासाठी विमा भरलेला आहे. त्यातून नुकसानभरपाई द्यावी, असे मु. पो. भालगाव (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील हरिभाऊ खेडकर यांनी मागणी केली आहे.
  • अतिवृष्टीमुळे बाधित झालेले क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

            जिल्हा----गावे----क्षेत्र

  • नगर---12----547
  • धुळे----4----10
  • पालघर----115----551
  • सिंधुदुर्ग----6----3
  • रायगड----99----302
  • जळगाव----128----2433
  • ठाणे----2----1
  • सोलापूर----31----11,625
  • रोग, किडींमुळे प्रादुर्भाव झालेले क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)  

    पीक क्षेत्र
    कापूस 2 लाख 15 हजार
    तूर 72 हजार
    भात 11 हजार

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com