पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?

जालना ः पावसाअभावी वाळून गेलेल्या मका पिकासह निर्मलाबाई मस्के.
जालना ः पावसाअभावी वाळून गेलेल्या मका पिकासह निर्मलाबाई मस्के.

झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(ता. १६)नंतर पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली खरी, पण आता महिनाभराच्या खंडाचा कोणत्या पिकांना नेमका किती फटका बसला? पावसामुळे फायदा झाला तर तो किती होईल? नुकसान भरून निघेल का? अशा शंका शेतकरी उपस्थित करत आहेत. सुलतानी संकटाचा सामना करता येईल, पण अस्मानी संकटाचं काय करावं. एक दोन वेळा पेरणी केली, पण पावसानं खरीप पिकांवर संकट तोंडावर आणून ठेवलं होतं. सकाळीच मंडप टाकून बसणारे ढग सायंकाळी बेपत्ता होत होते. कुठं आलेच तर चार दोन थेंब पडून लागलीच निघून जात. जी लोक शेतात काम करताना दिसतात त्यांचं मन कामात लागत नव्हतं. बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद व जालना तालुक्‍यात केलेल्या पाहणीत शेतकऱ्यांनी पावसाच्या खंडाने निर्माण झालेल्या स्थितीची माहिती दिली.  भोकरदन तालुक्‍यातील मूळच्या केदारखेडा येथील रहिवासी मात्र जवखेड ठोंबरे येथील लक्ष्मी सुरेश मोरे व सुरेश मोरे यांना पाऊस येईल का? असं विचारताच, देवालाचं डोळे म्हणून गप्प झाल्या. निंदण करतोय, पण कामात जीव लागत नाही. पिकाकडं पाहावंसं वाटत नाही. चार वर्ष झाली तळ्यात पाणीच येईना. थोडंबहुत आलं अन्‌ बीज टाकलं तर तळं आटून जातं. मासेमारीतही नुकसान अन्‌ इकडं असं. पोरीचं लग्न केलं, अंगावर लाखभर रुपयांचं कर्ज झालंय. आता हे पीकही गेलं तर धकवावं कसं हा प्रश्न आहे. वालसा डोंगरगावचे शंकर सादरे म्हणाले, की तीस एकरातील सोयाबीन, मका, कपाशी गेल्यातच जमा आहे. वावरात जावंस वाटत नाही. जवखेडा ठोंबरे येथील नारायण ठोंबरेंच्या तीन एकर शेतातील मका व कापशीची तीच स्थिती.  डावरगाव वालसा येथील गणपत वाढेकर म्हणाले, की पावसाअभावी मका बांड झाली. पाण्याची गरज भागविण्यासाठी शेतात तीन विहिरी, शेततळं केलं, पण वरूनच आलं नाही तर त्यात येणार कुठून. आता शेतात असलेल्या मिरचीला टॅंकरनं ईकत घेवून पाणी टाकतोय. ते पणं मिळलं तवरच चाललं. बदनापूर तालुक्‍यातील बावने पांगरी येथील दिगंबर सरोदे व रामेश्वर वखरे पावसाचा खेळ सांगताना निसर्गापुढे केलेल्या प्रयत्नांची हतबलता व्यक्‍त करीत होते. सरोदे म्हणाले, चार एकर शेती, त्यात यंदा तीन एकर कपाशी व एक एकर मूग केला. जूनच्या सुरवातीला पडलेल्या पावसामुळे जमिनीत झालेल्या ओलीच्या भरवशावर पुन्हा पाऊस येईल या आशेने कपाशीची लागवड केली. पण पावसाच्या दांडीन कपाशीची वाढ खुंटली. मूग पार वाळून गेला. मुलं शिकतात, अभ्यासात हूशार पणं कुठही शिकायला टाकायचं म्हणजे पैसा लागतो. शेतीत घातलेला पैसा परत मिळायची आशा नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे येताहेत. त्यांना ज्यात शिक्षण घ्यावं वाटतं ते घेता येत नाही.  रामेश्वर वखरे म्हणाले, ढगाळ वातावरणानं पिकं हिरवी दिसतात. ढग नसते तर सारं वाळून गेलं असतं. भोकरदन तालुक्‍यातील बरंजळा लोखंडे येथील निर्मलाबाई गंगाराम म्हस्के म्हणाल्या, आता पाऊस येऊनही उपेग नाही, पिकं वाळून गेलीत. दहा ईस टक्‍के आली तं नशीब म्हणावं. बदनापूर तालुक्‍यातील डोंगरगावचे देविदास उगले म्हणाले, प्यायला पाणी झालं नाही, तं पिकाला कुठून. पाऊस असा येतो की कपडे भिजत नाहीत.  तेलकट डागाने डाळिंबाला मिळेना दर  जालना व औरंगाबाद जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र जवळपास साडेचार हजार हेक्‍टर आहे. बहुतांश बागांमध्ये बुरशीजन्य व तेलकट डागांमुळे फळांना उचल नसल्याचे बदनापूर तालुक्‍यातील दुधनवाडीचे सुखदेव पडूळ म्हणाले. डागांमुळे यंदा डाळिंबाच्या बागांवर केलेला खर्च वसूल होईल की नाही अशी स्थिती असल्याचे पडूळ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com