कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या थांबून थांबून सरी सुरूच होत्या. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम होती. शुक्रवारी (ता. १८) दुपारपर्यंत पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ ३३ फूट १ इंच इतकी पाणीपातळी आहे.
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ Rain continues in Kolhapur; Rising water levels in rivers
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ Rain continues in Kolhapur; Rising water levels in rivers

कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या थांबून थांबून सरी सुरूच होत्या. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम होती. शुक्रवारी (ता. १८) दुपारपर्यंत पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ ३३ फूट १ इंच इतकी पाणीपातळी आहे. गेल्या चोवीस तासांत शाहुवाडीत सर्वाधिक ७६ मी. मी. पाऊस झाला.  या ठिकाणी इशारापातळी ३९ फूट, तर धोकापातळी ४३ फूट आहे आहे. इशारा पातळीपासून केवळ पाच फूट पाणी कमी आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत एकूण ५८ बंधारे पाण्याखाली होते. राधानगरी धरणातून एकूण विसर्ग : १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. जिल्ह्यातील कोणत्याही धरणातून ज्यादा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. अनेक धरणांतून विद्युत निर्मितीसाठी बाराशे ते पंधरा क्युसेक वेगाने पाणी चार दिवसांपासूनच सोडण्यात येत आहे. परिस्थिती बघूनच पाणी किती सोडायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बहुतांशी धरणात ३० ते ४० टक्के इतका पाणीसाठा आहे. तुळशी धरणात सर्वाधिक ५१ राधानगरी धरणात ३० टक्के पाणी साठा आहे. पंचगंगा नदीवरील एकूण ५८ बंधारे पाण्याखाली आहेत. नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले आहे.  कोयना धरणात ३५.१३  टीएमसी तर अल्लमट्टी धरणात २८.२५  टीएमसी इतका पाणीसाठा आहे. दुसऱ्या दिवशीही अनेक भागात थांबून थांबून सरी होत असल्याने शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. नवीन ऊस लागवड ही खोळंबल्या आहेत. वाफसा नसल्याने आडसाली लागवडींना काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पुराचा धोका टळला सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी (ता. १८) ओसरला. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत घट झाली असून, संभाव्य पुराचा धोका टळला आहे. अनेक मार्गांवरील पुलांवरून वाहत असलेले पुराचे पाणी देखील ओसरले असून, वाहतूक पूर्ववत झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागांत पाच दिवसांनंतर सूर्यदर्शन पाहायला मिळाले. जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेले दोन दिवस तर जिल्ह्याच्या बहुतांशी भागात संततधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. तेरेखोल नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे या नदीचे पाणी बांदा शहरात शिरले. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. कणकवली शहरात देखील एक दोन ठिकाणी पाणी साचले.  जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेती, ऊस शेती, बागायतींमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले. खारेपाटणमध्ये देखील पुराचे पाणी वाढत असल्यामुळे तेथे पुराचा धोका निर्माण झाला होता. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पूरस्थिती गंभीर बनण्याची शक्यता होती.  संपूर्ण जिल्हा पूरस्थितीच्या उंबरठ्यावर गुरुवारी (ता. १७) दुपारनंतर पावसाचा जोर कमी होऊ लागला होता. त्यानंतर रात्री उशिरा काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. परंतु पाऊस उघडीप देत आहे. तास-दीड तासांच्या फरकाने पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी अधूनमधून सूर्यदर्शन देखील होत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील घट झाली आहे. त्यामुळे विविध मार्गावर आलेले पुराचे पाणी ओसरले आहे, वाहतूक सुरळीत झाली आहे. जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. संततधारेमुळे खोळंबलेल्या शेतीच्या कामांना देखील सुरूवात झाली आहे. रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला रत्नागिरी : दोन दिवस मुसळधार पावसाने दणका दिल्यानंतर शुक्रवारी (ता. १८) जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. वेगवान वारे आणि ढगाळ वातावरणामुळे पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भात रोपांच्या वाढीला पुरेसा पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी ४३.३३ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड ७५.८०, दापोली  १२.१०, खेड ७७.८०, गुहागर ३०.१०, चिपळूण ३९.८०, संगमेश्वर ५५.९०, रत्नागिरी २३.९०, राजापूर २०, लांजा ५४.६० पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे; मात्र सरींवर सरी पडत असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. भात रोपांसाठी पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. पंधरा ते वीस दिवसांनी रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. शुक्रवारी (ता. १८) दिवसभर वेगवान वारे वाहत होते.  पावसामुळे जिल्ह्यात दापोली पाजपंढरी, शिरसोली, शिरसोश्वर, शिरसाडी, गिम्हवणेतील घरांचे मिळून एक लाखाचे तर माटवण येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात कळकवणे-आकणे-तिवरे येथील रस्त्यावर दरड कोसळली. तेथील वाहतूक आकळे-कादवड-तिवरे या मार्गे वळविण्यात आली आहे. टेटव येथील लिंगेश्वर मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने २४ हजार रुपये नुकसान झाले आहे.  गुहागर तालुक्यात पडवे, अडूर येथील घराचे पावसामुळे नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यात कुचांबे, पांगरी, पुर्ये देवळे बौध्दवाडी येथील घरांचे तर तुळसणीतील विहिरीचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. कृष्णा, वारणा नदीच्या  पाणीपातळीत सांगलीत वाढ सांगली : जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने वारणा नदी व कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १७.५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात ३४.९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. सांगलीत आयर्विन पुलाची पातळी २३ फूट इतकी झाली आहे.   जिल्ह्यात गेली तीन दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे. चांदोली धरण क्षेत्रातही पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. चांदोली धरणातून सध्या १६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यात दमदार पाऊस झाला. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. दोन्ही नद्यांवरील अनेक पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी दुपारपर्यंत जोरदार पाऊस झाला. दु्ष्काळी पट्ट्यात हलका पाऊस झाला. शिराळा तालुक्यातील पाझर तलाव तुडुंब भरले आहे. अनेक ठिकाणी तलावातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. शेतात पाणी साचले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com