Rain damage to crops in Marathwada
Rain damage to crops in Marathwada

मराठवाड्यात दाणादाण

मराठवाड्यात मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तब्बल १८२ मंडलांत अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद : मराठवाड्यात मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तब्बल १८२ मंडलांत अतिवृष्टी झाली. बीड, लातूर, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्यांत सरासरी अतिवृष्टी झाली. तर औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांतही पावसाने मोठा धुमाकूळ घातला. त्यामुळे मराठवाड्यातील नद्या, नाले दुथडी भरून, तर शेतीपीक पाण्याखाली जाऊन शिवारे जलमय झाल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यात सोमवारी (ता. २७) रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी (ता. २८) सकाळी ११.३० वाजेपर्यंत विविध भागांत कमी अधिक प्रमाणात बरसने सुरू होते. नांदेड जिल्ह्यातील ६५, बीड जिल्ह्यातील २९, लातूर जिल्ह्यातील ३०, औरंगाबादमधील १०, जालन्यातील १३, उस्मानाबाद १२, हिंगोलीतील १७ व परभणी जिल्ह्यातील ६ मंडळांचा अतिवृष्टी झालेल्या मंडळात समावेश आहे. गोदावरीसह जवळपास सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर सकाळच्या सत्रात काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्यांत सरासरी ३० ते १०४ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. सोयगाव तालुक्यातील सरासरी १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील सहा तालुक्यांत सरासरी ३६ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. जाफराबाद तालुक्‍यात सरासरी ७५ ५९ मिलिमीटर, तर अंबड सरासरी ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील ८ तालुक्यांत सरासरी ४० मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातील सर्वच दहा तालुक्‍यांत सरासरी ४० मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाला. चाकूर तालुक्यात सरासरी ७२, लातूर ८२.७, जळकोट ७५.७, अहमदपूर ८२.७ तर उदगीर तालुक्यात सरासरी ६९.७ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील आठपैकी सात तालुक्यांत सरासरी ३० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. कळंब तालुक्यात सरासरी ७७.१ मिलिमीटर, तर उस्मानाबाद तालुक्यात सरासरी ९१.१ मिलिमीटर पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात तर आभाळ फाटल्यागत पाऊस झाला. सर्व सोळा तालुक्यांत सरासरी ४२ ते १४८ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. ९ तालुक्‍यांत सरासरी १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्व सोळा तालुक्यांत सरासरी ४२ ते १४८ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. ९ तालुक्‍यांत सरासरी १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामध्ये नांदेड तालुक्यात ११०.४, बिलोली ११२.५, कंधार १०३.९, लोहा १०२.६, मुदखेड १०९.४, धर्माबाद १४८.५, उमरी १३०.६, अर्धापूर १२८.४ तर नायगाव खुर्द १००.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यांत सरासरी ३० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. पूर्णा तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी ६५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांत सरासरी ५६ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात ७९.३, कळमनुरी ७८.८, तर वसमत तालुक्यात सरासरी ७६.१ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे उघडले सोमवारी मध्यरात्रीपासून जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू असल्याने पूर्णा, केळणा आणि धामणा नद्यांना पूर आला. या नद्यांचे पुराचे पाणी खडकपूर्णा धरणात आल्याने खडकपूर्णा धरणातील पाणि पातळी वाढली. त्यामुळे  मंगळवारी (ता. २८) सकाळी पाच वाजेपासून धरणाचे १९ दरवाजे ०.५० मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे खडकपूर्णा प्रकल्पाचे पूर नियंत्रण कक्षाचे पुरुषोत्तम भागिले यांनी सांगितले. प्रकल्पातून ३७ हजार ९४० क्युसेक (१०७३.५) विसर्ग नदीपात्रात सुरू होता. तर खडकपूर्णा धरणामध्ये ९० टक्के एवढा जलसाठा होता. जलाशयातील पाणीपातळी ५२०.१८ मीटर एवढी होती. जाफराबाद तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या.

अनेक गावांचा संपर्क तुटला माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील पात्रुड - लोणगाव रस्त्यावर असलेल्या नदीला मोठा पूर आला. यामुळे लोणगाव, उमरी, सिमरी पारगाव, जिवनापूर यांसह तांडे, वाडी, वस्त्यासह पंधरा गावांचा संपर्क तुटला. तर माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात मागील चार ते पाच दिवसांपासून बरसत असलेल्या मोठ्या पावसामुळे धरणाचे ५ दरवाजे अडीच मीटरने तर ६ दरवाजे दोन मीटरने असे एकूण अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. सुमारे ८८ हजार ४०७ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडले असल्याने गोदावरी व सिंदफणा नदीला पूर आला आहे. या पुराने अनेक गावांचा संपर्क तुटला असून पाणी गावात देखील शिरले होते.

१०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे भाडगाव १०८ (जि. जळगाव), सोयगाव १३१ (जि. औरंगाबाद), धारूर ११२, अंबाजोगाई १०७ (जि. बीड), अर्धापूर १२९, मुखेड १२३, धर्माबाद ११५, बिलोली १०८, कंधार १०८, नांदेड १०५ (जि. नांदेड), कळंब १०० (जि. उस्मानाबाद), जेवती १०३ (जि. चंद्रपूर).

  • जोरदार पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले
  • नाशिकमधील गंगापूर धरणातून ३४२६ क्युसेकने विसर्ग सुरू
  • दहागाव पुलावरून नांदेड ते नागपूर जाणारी बस वाहून गेली. चार जण बुडाल्याची भीती
  • यवतमाळ जिल्ह्यात पावसाने कपाशी, सोयाबीन पिकाचे नुकसान
  • खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू
  • पात्रुड - लोणगाव (जि. बीड) रस्त्यावरील नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला
  • सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटलाही कुरनूर धरणातून विसर्ग वाढवला
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकांना पावसाचा धोका
  • वऱ्हाडात सर्वत्र पावसाची हजेरी, बुलडाण्यात अतिवृष्टी  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com