कमी दाबाचे क्षेत्र विरताच जोर ओसरला

कमी दाबाचे क्षेत्र विरताच जोर ओसरला
कमी दाबाचे क्षेत्र विरताच जोर ओसरला

पुणे : बंगालच्या उपसागरात किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (ता. २८) निवळले. परिणामी सकाळपासून राज्यातील पावसाचा जोरही ओसरला. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी येत होत्या. तर अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक ३२० मिलिमीटर, तर अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.  नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर तसेच नाशिक शहर व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे धारणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दारणा धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, भावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्र्यंबकेश्‍वर शहरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली होती. मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील ओंडओहोळ नदीलाही पूर आला. नगर जिल्ह्याच्या अनेक भागांत अजून पावसाचा जोर नाही. मात्र भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस टिकून आहे. त्यामुळे मुळा व भंडारदरा धरणात दोन-तीन दिवसांपासून पाण्याची बऱ्यापैकी आवक होत आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दुपारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पश्‍चिम भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा नद्यांचे पाणी दुथडी भरून वाहू लागले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्‍यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील लाटवण, पिंपळगाव, चिंचघर नदीकिनारा जलमय झाला होता. भारजा नदी तुडुंब भरून आपले पात्र सोडून वाहू लागल्याने शेकडो एकर भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात शेतीचे नुकसान होणार असून, शेतकरी चिंतातूर झाला आहे.  पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोटातील पावसामुळे नद्यांना पूर आले असून, धरणे भरू लागली आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. या तीन जिल्ह्यांतील अनेक भागांत रविवारी दुपारपर्यंत अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी येत होत्या. ओढे, नाले, नद्या प्रवाहित होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.  रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

  • कोकण : माथेरान २४०, खालापूर २३०, सुधागड पाली २००, माणगाव, रोहा प्रत्येकी १९०, पेन १८०, बेलापूर, जव्हार, मोखेडा प्रत्येकी १५०, महाड १३०, मुरबाड १२०, शहापूर १००, अलिबाग, अंबरनाथ, कल्याण, उरण प्रत्येकी ९०, ठाणे ८०, भिवंडी, पोलादपूर, उल्हासनगर, वाडा प्रत्येकी ७०, खेड, मालवण, मंडणगड, म्हसळा प्रत्येकी ६०, मुरूड, विक्रमगड प्रत्येकी ५०.       
  • मध्य महाराष्ट्र : वेल्हे १९०, त्र्यंबकेश्‍वर १७०, पौड, मुळशी प्रत्येकी १४०, इगतपूरी १३०, वडगाव मावळ १२०, राजगुरुनगर ११०, घोडगाव, जेऊर, महाबळेश्‍वर, सुरगाणा प्रत्येकी १००, पेठ ८०, गगणबावडा, जुन्नर, शाहूवाडी, हर्सुल, राधानगरी प्रत्येकी ६०, भोर, गारगोटी, नवापूर, ओझरखेडा प्रत्येकी ५०, अक्कलकुवा, हातकणंगले, जामनेर, पन्हाळा, पाटण, पुणे, शहादा, वाई प्रत्येकी ४०.  
  • मराठवाडा : किनवट, मानवत, पाथरी माहूर, धर्माबाद, गेवराई, घनसावंगी, हदगाव, हिमायतनगर, हिंगोली, कळमनुरी, पालम, पूर्णा, सेलू, सोयेगाव प्रत्येकी २०, अंबड, बिलोली, जाफराबाद, लोहा, मंथा, मुदखेड, नायगाव खैरगाव, नांदेड, पैठण, परभणी, परतूर, उमरी, वसमत प्रत्येकी १०.
  • विदर्भ : खारंघा ९०, सावळी, अमगाव प्रत्येकी ७०, मुल, सालकसा, चिखलदरा प्रत्येकी ६०, गोंदिया, गडचिरोली, आष्टी, चामोर्शीरू सेलू, सिंदेवाही, मोर्शी, हिंगणा, उमरेड, मुलचेरा प्रत्येकी ५०, चिमूर, वरूड, चांदूरबाजार, आर्वी, वरोराा, पातूर, तिवसा, नरखेडा प्रत्येकी ४०, धानोरा, सिंरोंचा, वर्धा, गोंदिया, मलकापूर, मालेगाव, संग्रामपूर, मूर्तिजापूर, धामणगाव रेल्वे, हिंगणघाट, अहेरी, अकोट, अरमोरी, रिसोड, सावनेर, भद्रावती, समुद्रपूर, नागभिड, परतवाडा, अमरावती, भिवापूर, दर्यापूर प्रत्येकी ३०.
  • घाटमाथा : ताम्हिणी ३२०, कोयना (नवजा), दावडी, शिरगाव प्रत्येकी २७०, खंद, भिवापुरी, लोणावळा प्रत्येकी २५० खोपोली २१०, वळवण १९०, वाणगाव १८०, शिरोटा १७०, अम्बोणे १४०, डुंगरवाडी, ठाकूरवाडी प्रत्येकी १३०.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com