पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

दमदार पावसामुळे भात पिकाला फायदा झाला आहे.
दमदार पावसामुळे भात पिकाला फायदा झाला आहे.

पुणे  : जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पाणलोट क्षेत्रातून येणारी आवक मंदावल्याने धरणातून पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. नदीपात्रातील पाणी कमी होऊन पूर स्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे. मात्र उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू असून, भीमेतून मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्याने उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढून दुपारी एक लाख पन्नास हजारांवर पोचला. 

सर्वच धरणातून कमी-अधिक विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, निरा आणि कानंदी, आरळा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत, मात्र नद्यांची पाणीपातळी काहीशी कमी झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे भरली असून, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे सर्व धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून होणारा विसर्ग ४५ हजार क्युसेकहून १८ हजारांपर्यंत कमी झाला. पवना धरणातील विसर्ग १८ हजारांवरून २५००, तर मुळशी धरणातील विसर्ग ३४ हजारांहून १० हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला होता. 

मुळा मुठेची पाणीपातळी कमी होणार असली तरी पूरस्थिती कायम राहणार आहे. बंडगार्डन बंधाऱ्याजवळ मुळा-मुठा नदीत १ लाख १७ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. दौंड येथील नदीपात्रात २ लाख २२ हजार ९६ क्युसेक वेगाने पाणी वाहत असल्याने भिमा नदी धोक्याच्या पातळीच्या वरच आहे. परिणामी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला आहे. निरा खोऱ्यातील वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी एक लाख क्युसेक वरून ७० हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशानातर्फे सांगण्यात आले. 

सोमवारी (ता. ५) दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील धरणांमधून सुरू असलेला विसर्ग (क्युसेक) : टेमघर ५४९, वरसगाव ३ हजार ४१२, पानशेत ७ हजार ३७६, खडकवासला ३९ हजार ६११, पवना २ हजार ५००, मुळशी १० हजार, कलमोडी १ हजार २७०, चासकमान ३ हजार ६८५, भामा आसखेड १ हजार ४७, आंद्रा ३ हजार ५७४, वडीवळे ७५३, गुंजवणी ४ हजार ५११,भाटघर ८ हजार ८१०, नीरा देवघर १० हजार ९४०, वीर ७० हजार, येडगाव ५ हजार ३२३, डिंभे ११ हजार ६३४, चिल्हेवाडी ६ हजार २१६, घोड २२ हजार ६००, उजनी १ लाख ५० हजार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com