मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हुलकावणी

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हुलकावणी
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हुलकावणी

औरंगाबाद : दोन ते तीन जिल्ह्यांतील काही मंडळांचा अपवाद वगळता मराठवाड्यात सार्वत्रिक पावसाचे हुलकावणी सत्र सुरूच आहे. त्यामुळे अपवादात्मक ठिकाणी अतिजोरदार तर कुठे नजरा कायम आकाशाकडे होत्या. यामुळे अपवाद वगळता नुसते ढगाळ वातावरण अनुभवण्याचा योग मराठवाड्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांवर आला आहे.

दोन दिवसांपूर्वी पाऊस जोरदार बरसेल असा वाटणारा पाऊस नांदेड, हिंगोली जिल्ह्यासह परभणी, उस्मानाबाद, लातूर, बीडमधील काही भागांत थोडा बरा बरसला. औरंगाबाद शहराचा आसपासचा भाग वगळता औरंगाबाद जिल्ह्यावर पावसाची अवकृपा कायमच असल्याचे चित्र आहे. पाऊस येईल या आशेवर पेरणीयोग्य असो वा नसो पेरणी करणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी असल्याने पेरणीचा टक्‍का जास्त दिसतो आहे. त्यामुळे पेरणी झालेल्यांच्या व न झालेल्यांच्याही नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाच्या महसुली आकडेवारीनुसार मराठवाड्यात १० जुलैपर्यंत एकूण पडणाऱ्या वार्षिक पावसाच्या तुलनेत २०९.६४ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात २२२.४२ मिलिमीटर पाऊस पडला. तसे पाहता अपेक्षित पावसाच्या तुलनेत पडलेल्या पावसाचे सरासरी प्रमाण १०६ टक्‍के जास्त दिसते. तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत मात्र केवळ २८ टक्‍केच पाऊस पडला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद तालुक्‍याचा अपवाद वगळता अजून अपेक्षापूर्ती केली नाही. सिल्लोड (५८.८ टक्‍के), गंगापूर (५३.२ टक्‍के) व कन्नड (५६.५ टक्‍के) तालुक्‍यांत तर अपेक्षित पावसाच्या तुलनेत साठ टक्‍केही पाऊस झाला नाही. दुसरीकडे खुल्ताबाद (४६.६ टक्‍के) तालुक्‍यात पडलेला पाऊस, तर पावसाच्या लहरीपणाची साक्षच आहे. जालना जिल्ह्यातील आठपैकी एकाही तालुक्‍यात आजवर अपेक्षित पावसाचा टक्‍का एकाही तालुक्‍यात पार नाही. जाफ्राबाद (४२.३ टक्‍के) अपेक्षेच्या तुलनेत पडलेला पाऊस त्या तालुक्‍यातील पेरणी, पिकं आणि शेतकऱ्यांची अवस्था स्पष्ट करतो आहे.

जूनमध्ये मध्यान्हात पडलेल्या मोठ्या पावसानंतर मोठा पाऊसच नायं, उगी भुरभुर येती. ढगाळ वातावरण असल्यानं पिकं तगून हायेत. - ज्ञानोबा तिडके, शेतकरी, पांगरी, ता. परळी वैजनाथ, जि. बीड.

पाऊस फक्‍त बरा म्हणता येईल समाधानकारक नाहीच. - शेतकरी, साष्ट पिंपळगाव, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com