पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी

पोंढे परिसरात पावसामुळे कांद्याच्या शेतात साचलेले पाणी.
पोंढे परिसरात पावसामुळे कांद्याच्या शेतात साचलेले पाणी.

पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर, जुन्नर या तालुक्यांच्या कोरडवाहू पट्ट्यात शुक्रवारी दुपारनंतर मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली. शिरूर येथे सर्वाधिक १२० मिमी तर बारामती आणि इंदापूर तालुक्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पावसाने दडी मारल्यामुळे संकटात सापडलेल्या खरीप पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. 

पूर्व भागातील तालुक्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. शुक्रवारी सकाळपासून असलेल्या उन्हाच्या चटक्याने उकाड्यात वाढ झाली. दुपारनंतर मेघगर्जना, विजांसह जोरदार पावसाला सुरवात झाली.बारामती, इंदापूर तालुक्यांत सर्वदूर चांगला पाऊस पडला. बारामती तालुक्यातील बारामती शहर, माळेगाव, पनदरे, वडगाव, लोणी भापकर, इंदापुरातील सणसर येथे अतिवृष्टीची नोंद झाली. शिरूर आणि जुन्नर, पुरंदर तालुक्यांतही पावसाने दिलासा दिला. 

शनिवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिमी) : (स्रोत - महसूल विभाग) : थेऊर २६, थेरगाव ३५, किकवी ५२, वडगाव आनंद ३७, निमगाव सावा ४७, बेल्हे २७, आळंदी ३०, रांजणगाव १२०, कोरेगाव २३, बारामती ८०, माळेगाव ७६, पनदरे ९५, वडगाव ९०, लोणी भापकर ८९, सुपा ४५, लोणी ३५, बावडा २६, काटी ३३, निमगाव केतकी ३५, सणसर ७७, केडगाव २५, दौंड ३६.   खडकवासला प्रकल्पात ५१ टक्के पाणीसाठा पुणे शहरासह  हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये शनिवारी १४.८१ टीएमसी (५१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणात १.६१ टीएमसी, पानशेतमध्ये ५.९६ टीएमसी, वरसगावमध्ये ५.७४ टीएमसी, आणि टेमघर धरणात १.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा प्रकल्पात २५ टक्के कमी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी धरणांमध्ये २२.०४ टीमएसी (७६ टक्के) पाणी जमा झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com