हवेली, भोर, पुरंदर, बारामतीत पावसाची हजेरी

हवेली, भोर, पुरंदर, बारामतीत पावसाची हजेरी
हवेली, भोर, पुरंदर, बारामतीत पावसाची हजेरी

पुणे  : जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. रविवारी सायंकाळी हवेली, भोर, पुरंदर, बारामती, खेड या तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. खेड-शिवापूर परिसराला जोरदार पावसाने झोडपले. विशेषतः गोगलवाडी (ता. हवेली) आणि शिंदेवाडी (ता. भोर) या गावांमध्ये जास्त पाऊस झाला. या पावसाने अगोदरच शेती आणि पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. 

सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे शहरात ५२.३, खेडशिवापूर येथे १५, भोसरी येथे १६, नसरापूर येथे २१, वेळू येथे २७, राजगुरुनगर येथे १२, चाकण येथे १७, शेलपिंपळगाव येथे ४५, पणदरे येथे १०, लोणी भापकर येथे २०, भिवडी येथे ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पहाटे पडत असलेले धुके, दुपारी वाढलेला उन्हाचा चटका आणि सायंकाळी येणारा पाऊस, अशा वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, जमीन ओली असल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. सध्या बाजरी व मका पिके काढणीस आली आहेत. मात्र, पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले असून पिके काढणीचा खोळंबा झाला आहे.  पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीला बसला असून, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाळिंब व कांद्याचे नुकसान झाले असून कांद्याचे पीक पिवळे पडले आहे. कांद्याला विक्रमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली होती. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरवले आहे.

सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात गेले तीन ते चार दिवस पहाटेच्या वेळेत सर्वत्र धुक्याची दाट दुलई पसरत आहे. त्यातच संध्याकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कांदा पिकासह इतरही पिकांना यांचा फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. सातगाव पठार पसिरात बटाटा काढणीची कामे संपली असली तरी हे काढलेले बटाटे शेताच्या कडेला आरण लावून ठेवलेले आहेत. त्यामुळे रोज होणाऱ्या पावसाने ते भिजून नुकसान होण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com