कडाक्याची थंडी, जोरदार पाऊस, पण निर्धार कायम !!! आज बैठक

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची ३९दिवशी रविवारी वरुणराजानेही परिक्षा घेतली. पावसाच्या हजेरीने आंदोलनकर्त्यांची काही काळ धावपळ झाली असली, तरी शेतकऱ्यांत आंदोलनाचा निर्धार कायम होता.
कडाक्याची थंडी, जोरदार पाऊस, पण निर्धार कायम 
कडाक्याची थंडी, जोरदार पाऊस, पण निर्धार कायम 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची ३९ दिवशी रविवारी वरुणराजानेही परिक्षा घेतली. पावसाच्या हजेरीने आंदोलनकर्त्यांची काही काळ धावपळ झाली असली, तरी शेतकऱ्यांत आंदोलनाचा निर्धार कायम होता. पावसाने दिवसभरातील गारठ्यातही वाढ केल्याने दिवस शेतकऱ्यांची कसोटी पाहणारा ठरला. 

‘‘आम्ही आमच्या कुटुंबाला सोडून रस्त्यांवर अशा प्रतिकूल हवामानस्थितीत आंदोलन करत आहोत. केंद्र सरकार उद्या (आज, ता.४) आमच्या मागण्या मान्य करेल, अशी अपेक्षा आहे,’’ अशी प्रतिक्रिया गाझीपूर सीमेवरील एका आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने व्यक्त केली. पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे अंगावर कंबल ओढून शेतकरी गर्दी करून आपल्या ट्रॉलीमध्ये बसले होते. पावसामुळे काही ठिकाणी प्लास्टिकच्या छावण्यांचा आसरा शेतकऱ्यांनी घेतला होता. 

सिंघू सीमेवरही परिस्थिती वेगळी नव्हती. ‘‘पावसाने आमचे अन्न, कपडे आणि छत भिजल्याने समस्या निर्माण झाली असली, तरी आम्ही आंदोलनाबाबत किंचितही हटलेलो नाही. आम्ही अशा छोट्या सहन करू शकतो, मात्र जर कृषी कायदे लागू झाले, तर आम्ही पिढ्यांना ते सहन करावे लागेल. जेव्हा हे कायदेमागे घेतले जातील तेव्हाच आम्ही घरी परतू,’’ अशी प्रतिक्रिया सिंघू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने दिली. 

आज पुन्हा चर्चा  केंद्र सरकारबरोबर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची पुन्हा बैठक होणार आहेत. यात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीनही कायद्यांना रद्द करणे आणि हमीभावाचा कायदा करण्याबाबत शेतकऱ्यांनी आपला निर्धार यापूर्वीच व्यक्त केला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी (ता.२) पत्रकार परिषदेत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर ट्रॉली मोर्चाची घोषणा केली आहे. 

चंपारण्य आंदोलनाची आठवण येणार  शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने चंपारण्य समस्याची अनुभूती पुन्हा देशासमोर निर्माण होणार आहे. तेव्हा भारतात ब्रिटिश कंपन्या शेतकऱ्यांना लढावे लागले, आता पंतप्रधान मोदी यांच्या मित्रांच्या कंपन्या आहेत. मात्र आंदोलनातील प्रत्येक शेतकरी हा सत्याग्रही असून तो आपल्या हक्कासाठी लढाई सुरूच ठेवणार आहे. - राहुल गांधी यांचे ट्वीट 

‘‘थंड वातावरणाची आम्हाला सवय आहे. पावसाचे आगमन तर देवाचा आर्शिवाद आहे. आम्हाला पाऊस आणि थंडी थोपवू शकत नाही. आम्ही काही कारणास्तव येथे आलो आहोत आणि जोपर्यंत यात यश येत नाही, तो पर्यंत आमची माघार नाही.’’  - हरविंदर सिंग, शेतकरी, लुधियाना, पंजाब. 

पहिल्यांदाच एवढे मग्रूर सरकार : सोनिया  स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच एवढे मग्रूर सरकार केंद्रात आले आहे, ज्यांना अन्नदात्याच्या हालअपेष्टा दिसत नाही. लोकशाहीत जनतेच्या भावनांचा आदर न करणारे सरकार दीर्घकाळ टिकू शकत नाही. सरकारने वेळकाढूपणा करून आंदोलन निष्क्रीय करण्याचा प्रयत्न केला, तरी शेतकरी कोणत्याहीस्थितीत झुकणार नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही, मोदी सरकारने सत्तेची घमेंड बाजूला ठेऊन तीनही कृषी कायदे विनाशर्त मागे घेऊन थंडी आणि पावसात मृत्यूमुखी पडणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन समाप्त करावे. हा राजधर्म असून खऱ्याअर्थाने आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. थंडी-पावसाचा सामना करत दिल्लीच्या सीमांवर ३९ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या अन्नदात्याची स्थितीपाहून देशातील जनतेसह मीही प्रचंड अस्वस्थ आहे, असे त्या म्हणाल्या. 

आंदोलन आज संपेल अशी अपेक्षा : कृषी राज्यमंत्री चौधरी  केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सोमवारी होणाऱ्या चर्चेतून समाधान निघून आंदोलन संपेल, अशी आशा केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस या आंदोलनाच्या आगीत तेल ओतत असल्याचा आरोप मंत्री चौधरी यांनी केला. ते म्हणाले,‘‘नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मात्र, राहुल गांधी यात राजकारण करत असून शेतकऱ्यांना उकसवत आहेत. २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी ते का नाही भेटले अण्णांना? बाबा रामदेव यांना बळजबरीने आंदोलनातून त्यांनी काढले आणि ही माणसे न्याय आणि अन्यायाची भाषा करत आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या समवेत आहेत. सोनिया गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री चौधरी म्हणाले, कॉंग्रेसेच्या निवडणूक जाहीरनाम्यात हे तीनही कायदे होते, आम्ही सत्तेत आल्यानंतर ते लागू करू असे त्यांनी म्हटले होते. तेच कायदे आम्ही आणले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारे आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com