खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरी

मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारलेल्या वऱ्हाड, खानदेश, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात आलेल्या हलक्या ते मध्यम सरींनी खरीप पिकांना दिलासा दिला आहे.
rain
rain

पुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारलेल्या वऱ्हाड, खानदेश, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात आलेल्या हलक्या ते मध्यम सरींनी खरीप पिकांना दिलासा दिला आहे. पाणलोटात सुरू असलेल्या संततधार पावसाने लघुप्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर कोयना, तिलारीसह मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तर राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.  वऱ्हाडात बुधवारी (ता. ८) रात्री अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पातूर, मलकापूर, मोताळा, अकोला, नांदुरा, संग्रामपूर, खामगाव या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात या दोन दिवसांत पाऊस सक्रिय झाला आहे. तेल्हारा, संग्रामपूर तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.  नांदेड, परभणीत अतिवृष्टी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२४ मंडळांमध्ये गुरुवारी (ता. ९) सकाळीपर्यंत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, नांदेड, मुखेड, कंधार तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर होता. मुखेड आणि बाऱ्हाळी मंडळात अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील चिकलठाणा आणि कात्नेश्वर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील २१ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

जळगावात शेतकऱ्यांना दिलासा  जळगाव जिल्ह्यात बुधवारी (ता. ८) रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव, एरंडोल, धरणगाव या भागांत पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. या भागात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मुक्ताईनगर, बोदवड, यावल, भुसावळ या भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. या पूर्व भागात कमी पाऊस असल्याने मका, सोयाबीन, कापूस या पिकांची स्थिती नाजूक बनत असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.  

सिंधुदुर्गात पूरस्थिती कायम सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने पूरस्थिती कायम आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कसाल, ओरोस (ता.कुडाळ) भागाला बसला आहे. या भागातील २५ घरांमध्ये पुराचे पाणी भरल्याने बाधीत कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मुख्य मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. सांवतवाडी,कुडाळ,मालवण,कणकवली या तालुक्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. शुक आणि शांती नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे खारेपाटण शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १३ लघुप्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पात ८१.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागले कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने छोटे प्रकल्प भरण्यास प्रारंभ झाला आहे. गुरुवारीही पावसाची रिपरिप सुरूच होती. फाटकवाडी पाठोपाठ जांबरे (ता. चंदगड) मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे. कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. कुंभी, रुपणी, धामणी, सरस्वती नद्या दुथडी वाहत आहेत. कोदे, अणदूर, वेसरफ हे लघुप्रकल्प  पूर्ण क्षमतेने भरले आहेत. वारणा धरणातून वीजनिर्मितीसाठी ८१५ क्‍युसेक विसर्ग सुरूच आहे. रेठरे-कोकरुड दरम्यानचा वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

साताऱ्यातही पाऊस सुरूच   सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई, सातारा या तालुक्यात अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर, पाटण, जावळी या तालुक्यात पावसाचे  प्रमाण अधिक आहे. दुष्काळी तालुक्यात मात्र अगदी तुरळक पाऊस होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोटात होत असलेल्या पावसाने २४ तासांत धरणात २.१८ टीएमीसीने वाढ झाली आहे. धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गुरूवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत  पडलेला पाऊस, मिलिमीटर (स्त्रोतः हवामान विभाग)  कोकण : जव्हार ३६, भिरा ६२, कर्जत ३५, महाड ५८, माणगाव ४५, माथेरान ७६, पेण ४०, पोलादपूर ६५, रोहा ४२, सुधागडपाली ४२, तळा ४९, चिपळूण ६९, दापोली ७३, गुहागर ४१, हर्णे ११३, खेड ६७, लांजा ७७, मंडणगड ७६, राजापूर ८७, रत्नागिरी ६१, संगमेश्वर ५६, देवगड ११२, दोडामार्ग ५५, कणकवली १३६, कुडाळ ६६, मालवण १४६, रामेश्वर ७७, वैभववाडी ६१, आंबरनाथ ५१, शहापूर ४८, ठाणे ५३, उल्हासनगर ७०.

मध्य महाराष्ट्र : पारनेर ४७, श्रीगोंदा ३६, जळगाव ३८, जामनेर ६४, मुक्ताईनगर ३३, आजरा ३८, गगनबावडा ९१, राधानगरी ३९, शहादा ३५, हर्सूल ३६, इगतपुरी ७०, लोणावळा कृषी ४८, वेल्हे ६६, जत ३६, महाबळेश्वर ११२, बार्शी ३८, सेालापूर ३३,

मराठवाडा : खुल्ताबाद ४२, अहमदपूर ६२, देवणी ३६, जळकोट ३०, देगलूर ४३, लोहा ४४, मुखेड ६७, उस्मानाबाद ६३, परभणी ५८, पाथरी ३१, सोनपेठ ५०, 

विदर्भ : अकोला ४०, बार्शीटाकळी ३१, मर्तिजापूर ४७, पातूर ३२, मलकापूर ३९, नांदुरा ३७, शेगाव ३०, करंजालाड ४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com