कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस 

अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जाणवू लागला आहे. अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामानासह पूर्वमोसमीच्या सरींनी हजेरी लावली आहे.
rain
rain

पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जाणवू लागला आहे. अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामानासह पूर्वमोसमीच्या सरींनी हजेरी लावली आहे. उन्हाचा झळा कमी होऊन हवेत गारवा आला आहे. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी, उन्हाळी पिकांना तसेच खरीपाच्या तयारीला हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात वादळाचा अधिक प्रभाव जाणवत असून, किनारपट्टीलगत ढगांची दाटी झाली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने आंबा, काजू पिकांना फटका बसणार आहे. पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्टात भात रोपवाटिकेच्या कामांना, तर पूर्व पट्यातही नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. सांगली जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा मॉन्सूनपूर्व पाऊस पडला. पश्चिम भागात दमदार तर पूर्व भागात संततधार सरींची बरसात झाली. शिराळा, वाळवा तालुक्‍यात दमदार पाऊस पडला. पाऊस उन्हाळी पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात अनेक भागात आडसाली ऊसाच्या लागवडी झाल्या आहेत. या उसाला संजीवनी मिळणार आहे. 

सातारा जिल्ह्यातही सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाल्याने नुकसान झाले आहे. खरिपाच्या तोंडावर पावसाने हजेरी लावल्याने पेरणी पूर्व कामांना गती येणार आहे. सातारा, कराड, जावळी, पाटण, खटाव, माण, महाबळेश्वर याही तालुक्यात काही ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यात पाऊस झाल्याने टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई या तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले असले तरी खरिपाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. ऊस, आले लागवडीसह पेरणीपूर्व कामांना गती येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेचा कडकडाट आणि वादळवाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस पडला. खरीप हंगामाच्या तोंडावर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. माळशिरस, पंढरपूर, बार्शी, सांगोला, करमाळा व माढा तालुक्यातही पावसाचा पुन्हा जोर राहिला. 

मराठवाड्याला तडाखा  मराठवाड्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. पावसामुळे शेतशिवारांत खरीप पेरणीपूर्व कामांची लगबग सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा या तालुक्यात, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, पालम या तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक होता. वादळासह झालेला हा पाऊस आंबा डाळिंब पिकाचे काही ठिकाणी नुकसान करून गेला. पावसाने खरीप पेरणीसाठी शेत शिवारातील लगबग वाढली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com