कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या सरी

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत.
rain
rain

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. शनिवारी (ता.८) सकाळी आठ वाजेपर्यंत कोल्हापुरातील चंदगड येथे ८९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर, मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भाग, खानदेश, विदर्भात पावसाने उघडीप दिली असून अधूनमधून ऊन पडल्याचे चित्र होते. कोकणात गेल्या तीन ऑगस्टपासून धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या भागात परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दोडामार्ग येथे ७९ मिलिमीटर पाऊस पडला असून अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडत आहे. घाटमाथ्यावरील भिवपुरी येथे १६० मिलिमीटर तर ताम्हिनी ११२, शिरगाव १२०, कोयना (नवजा) १०६ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यातील पश्चिम भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पश्चिम भागातील अनेक धरणातील पाणीसाठाही कमी करण्यात आला आहे. राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यापैकी विद्युत विमोचनातून १४००, सांडव्यातून २८५६ असा एकूण ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहेत. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. साताऱ्यातील महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा या तालुक्यात काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. कोयना धरणात क्षेत्रातही पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. धरण क्षेत्रात हलका पाऊस झाल्याने २.४४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात एकूण ७१.५५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात ३२ हजार ५९१ क्युसेक आवक होत आहे. इतर प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने या सर्व धरणातील पाणीसाठा ७० टक्केवर गेला आहे. पुणे जिल्ह्यातही लोणावळा व वेल्हे परिसरात मध्यम स्वरूपाचा, इतर तालुक्यात हलका पाऊस पडला. सोलापूर, नगर, नाशिक, खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात हवामान ढगाळ असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे.  मराठवाड्यातील बहुतांशी सर्वच जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान आहे. गेल्या चोवीस तासात भोकर, धर्माबाद, कंधार, लोहा, मुदखेड, उमरी येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सध्या या भागात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. विदर्भातील तुमसर येथे ६२.४ मिलिमीटर पाऊस पडला. तर भंडारा, गोंदिया, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.

शनिवारी (ता.८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)  कोकण : जव्हार ३६, वाडा ३४, भिरा ४७, कर्जत ४४.१, खालापूर ३६, माथेरान ५०, पनवेल ३५.६, पेण ५०, रोहा ३४, लांजा ५७, दोडामार्ग ७९, कुडाळ ४४, सावंतवाडी ४५, वैभववाडी ४६, कल्याण ३८, उल्हासनगर ४१, मध्य महाराष्ट्र ः आजरा ५३, चंदगड ८९, गगणबावडा ८२, गारगोटी ३०, पन्हाळा ४८, राधानगरी ८१, शाहूवाडी ३१, लोणावळा कृषी ५८, पौड २२, वेल्हे ६५, शिराळा २६, जावळीमेढा २०.१, महाबळेश्वर ५७, पाटण २७. मराठवाडा : धर्माबाद २०, लोहा ४१, मुदखेड १४. विदर्भ : भंडारा ३७.७, लाखणी ४२, मोहाडी ३९.२, साकोळी ४७, तुमसर ६२.४, भामरागड ४२, सडकअर्जुनी ४७.७, पारशिवणी ४५., रामटेक ३९.८

उद्यापासून पुन्हा पाऊस वाढणार अरबी समुद्र आणि महाराष्ट्र या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. उत्तर अरबी समुद्र ते दक्षिण पाकिस्तान या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे कोकण, विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उद्यापासून (ता.१०) कोकण, विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होऊन यामध्ये ते जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com