मराठवाडा, विदर्भात पावसाच्या हलक्या सरी

मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. तर, मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाने काहीशी उघडीप दिल्याचे चित्र असून, हलक्या सरींनी हजेरी लावली.
SANGALI
SANGALI

पुणे : मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. तर, मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाने काहीशी उघडीप दिल्याचे चित्र असून, हलक्या सरींनी हजेरी लावली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी, रायगड, कोल्हापूर जिल्‍ंह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तर कोल्हापूर, सांगलीत नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

गुरुवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे १९० मिलिमीटर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे १६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. मात्र, गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काही अंशी ओसरला आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, कुठेही पूरस्थिती नाही. भातलावणीला पोषक पाऊस पडत आहे. त्यामुळे रोपे वाढलेल्या शेतकऱ्यांनी भातलावणी सुरू केली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी (ता. १८) पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी वाढत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर शहराबाहेरील वळण उजळाईवाडी ते विमानतळ रस्ता राष्ट्रीय महामार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर एक फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून, आंबेवाडी चिखलीमार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यावर २ फूट पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. राधानगरी तालुक्‍यातील तिन्ही धरणांवर, तसेच गगनबावड्यात अतिवृष्टीची नोंद झाली. राधानगरी धरण क्षेत्रावर १७३ मिलिमीटर, तुळशी धरण क्षेत्रावर १३२ तर काळम्मावाडी धरण क्षेत्रावर ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. राधानगरी धरणाची पाणीपातळी तब्बल चार फुटांनी वाढली आहे. राधानगरी धरणातून १९०८ क्युसेक विसर्ग, तर कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, दमदार पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने सर्व कामे ठप्प होणार आहेत. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्वर, पाटण, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगावला पावसाचा जोर अधिक आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यांत हंगामाच्या सुरुवातीस हा पाऊस झाल्याने दुष्काळी जनतेला दिलासा मिळाला असून, किमान पेरणीची कामे वेळेत सुरू होण्यास मदत होणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची रिपरिप सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.  सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्‍यातील चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. कोकरुड-रेठरे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील वाळवा, पलूस कडेगाव तालुक्‍ंयासह अन्य ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. दुष्काळी पट्ट्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तालुक्‍यांत दमदार पाऊस झाला. त्यामुळे बळिराजा सुखावला आहे. शिराळा तालुक्‍यात पावसाचा जोर काहिसा कमी झाला आहे. परंतु, चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे चांदोली धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. धरणातून एक हजार क्‍युसे‍क पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे. गुरुवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला, तर काही ठिकाणी पावसाचा जोर चांगला असल्याने पेरण्यांना सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर हवामान ढगाळ असले, तरी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे ओढे, नाले काही प्रमाणात वाहू लागले आहेत.  गुरुवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : 

कोकण : महाड ३०, माणगाव ३६, म्हसळा ८८, पोलादपूर ५०, श्रीवर्धन १६७, तळा ३०, चिपळूण ७३, दापोली १३०, गुहागर ८८, हर्णे ९४, खेड ७०, लांजा १४६, मंडणगड ७४, राजापूर १९०, रत्नागिरी १२२, संगमेश्वर १०५, देवगड ९९, दोडामार्ग ८८, कणकवली ९७, कुडाळ १०५, मालवण १६२, मुलदे (कृषी) ११३, रामेश्वर ८७, सावंतवाडी १५५, वैभववाडी ११०, वेंगुर्ला १६३. 

मध्य महाराष्ट्र : आजरा ४९, चंदगड ८०, गडहिंग्लज ३९, गगनबावडा ११४, गारगोटी ५१, पन्हाळा ५८, राधानगरी ५८, शाहूवाडी ६८, सिन्नर ५८, शिराळा ३९, महाबळेश्वर ७५, पाटण ४२. 

मराठवाडा : परळी वैजनाथ ४३.  १०० पेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे  श्रीवर्धन १६७ (जि. रायगड), राजापूर १९०, लांजा १४६, दापोली १३०, रत्नागिरी १२२, संगमेश्वर १०५ (जि. रत्नागिरी), वेंगुर्ला १६३, मालवण १६२, सावंतवाडी १५५, वैभववाडी ११०, मुलदे (कृषी) ११३, कुडाळ १०५ (जि. सिंधुदुर्ग), गगनबावडा ११४ (जि. कोल्हापूर)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com