ऊस लागवडीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा

ऊस लागवडीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा
ऊस लागवडीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा

पुणे ः जुलै महिन्यातील एक आठवडा ओलांडला तरीही पुणे विभागातील अनेक भागांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. येत्या महिनाअखेर अशीच स्थिती राहिल्यास आडसाली उसाची लागवड खोळंबण्याची शक्यता आहे. चांगला पाऊस झाल्यास ऊस लागवड सुरू होईल. यंदा उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे पुणे विभागात उशिराने पाऊस सुरू झाला. मात्र, अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस झाला. हा पाऊस पेरण्यांसाठी पुरेसा असला तरी भूजल पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. नगर जिल्ह्यातील अकोले, पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड या तालुक्यांत पावसाचा जोर चांगला असला, तरी या भागात उसाच्या मोठ्या प्रमाणात लागवडी होत नाहीत. त्यातच ही तालुका भाताचे तालुके ओळखले जातात. उर्वरित तालुक्यांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही.  दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यात आडसाली उसाच्या शेतकरी प्रामुख्याने लागवडी करतात. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात. पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी चार लाख १३ हजार ५८१ हेक्टर क्षेत्र आहे. विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, कर्जत, नेवासे, पाथर्डी, राहाता या तालुक्यांत जून, जुलैमध्ये बऱ्यापैकी ऊस लागवडी सुरू होतात. पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, पुरंदर, आंबेगाव, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर या तालुक्यांत उसाच्या लागवडी झालेल्या नाहीत.  पुणे विभागात मुळा, भंडारदरा, कुकडी, खडकवासला, वीर, पानशेत अशा काही धरणांमध्ये नवीन पावसाच्या पाण्याची आवक सुरू आहे. यंदा ही धरणे भरली तर ऊस लागवडी होतील, अशी शक्यता आहे. मात्र, इतर पिकांच्या तुलनेत ऊसपीक हे शाश्वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी उसाच्या लागवडी करतात. जून, जुलै महिन्यात कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग आदी कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला. त्यामुळे ऊस लागवडीत घट होणार असल्याचे चित्र आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com