उस्मानाबाद, लातूर, साताऱ्यात वादळी पाऊस

पूर्वमोसमी पावसाने मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या काही तालुक्यांना तडाखा दिला.
rain
rain

पुणे : पूर्वमोसमी पावसाने मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या काही तालुक्यांना तडाखा दिला. वादळी वारे, गारपिटीसह झालेल्या पावसाने गहू, ज्वारीसह रब्बी पिके, टोमॅटो, काकडी आदी भाजीपाला तर कलिंगड केळी, द्राक्षे, आंबा या फळपिकांना दणका दिला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.    वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक गारपिटीसह आलेल्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा,भूम तालुक्यात फळपिकांचे नुकसान केले. तर अनेकांच्या घरावरील पत्रे वादळाने उडून गेली. जिल्ह्यातील तेर, जागजी, उस्मानाबाद शहर, जळकोट, नळदुर्ग, माकणी, शिराढोण, माणकेश्वर, परांडा, जवळा बुद्रुक व आसू मंडळात वादळी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद तालुक्यातील उपळे (मा), वाघोली परिसरात गारपीट झाली. परंडा तालुक्यातील रोहकल परिसरात जोरदार वाऱ्याने भारत देशमुख यांची केळीबाग आडवी झाली. अंतरगांव ( ता. भूम ) येथे सोमवारी ( ता. 13 ) दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, उदगीर तालुक्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडला. वादळी वारे झाल्याने फळ बागांना त्याचा फटका बसला. निलंगा तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. आंबा, द्राक्षे या फळ पिकांना तडखा दिला. मदनसुरी परिसरात गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.  सातारा जिल्ह्यात सकाळपासून वाढलेल्या उकाड्यानंतर दुपारी जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह खटाव तालुक्‍यातही पुर्वमोसमी पावसाने गारा व वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. पाटण व खटाव तालुक्यातील काही घरांचे पत्रे उडून गेले आहेत. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेती पिकांचे आणि आंब्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. कऱ्हाड तालुक्‍यातील शिरवडे, नडशी,कोपर्डे, हेळगाव, पाडळी, किवळ, चिखली, निगडी, रिसवड, अंतवडी या गावांना पावसाने तडाखा दिला. काढणीस आलेल्या टोमॅटो, काकडी, कलिंगडासह आंब्याला याचा फटका बसला. पाटण तालुक्‍यातील मोरणा विभागात कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारांचाही वर्षाव झाला. आंबा पिकासह ज्वारी व गहू, तसेच कडबा भिजून नुकसान झाले. या पिकांचे नुकसान : गहू, ज्वारी, टोमॅटो, वांगी, शेवगा, काकडी, कलिंगड, खरबूज, केळी, द्राक्ष, आंबा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com