मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज

हवामान
हवामान

पुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली अाहे. कोकण वगळता राज्याच्या बहुतांशी भागात तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. गेल्या आठवड्यात असलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वाढलेला उन्हाचा ताप असह्य होत आहे. शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३८.६ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत असून, आज (ता. २३) मराठवाड्यात, तर उद्यापासून (ता. २४) विदर्भात पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे पारा ३८.६ अंशांवर गेल्याने उन्हाचा चटका चांगला वाढला आहे. मालेगावमध्ये २८ फेब्रुवारी २०१७ मध्ये फेब्रुवारी महिन्यातील आतापर्यंतच्या उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर गतवर्षी मालेगाव येथे २८ फेब्रुवारी रोजी ३६.६ अंश तापमान नोंदले गेले होते. जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा येथेही तापमान ३७ अंशांवर गेले आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ होत असल्याने थंडी कमी झाली अाहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढग गोळा झाले होते. आज (ता. २३) मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात, तर रविवारी (ता. २४), सोमवारी (ता. २५) विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. शुक्रवारी (ता. २२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.४ (१९.२), नगर -(१८.६), जळगाव ३७.६ (१८.०), कोल्हापूर ३५.० (२०.५), महाबळेश्‍वर ३०.७ (१८.४), मालेगाव ३८.६ (१९.२), नाशिक ३५.८ (१७.०), सांगली ३५.८ (१८.५), सातारा ३५.५ (१९.७), सोलापूर ३७.१ (२१.६), सांताक्रूझ २९.५ (२१.२), अलिबाग २६.७ (२०.७), रत्नागिरी ३१.० (२०.८), डहाणू २८.६ (१९.५), औरंगाबाद ३५.४ (२१.०), बीड ३७.५ (२१.५), परभणी ३७.५ (२०.९), नांदेड ३७.० (२१.०), उस्मानाबाद ३३.९ (१९.०), अकोला ३७.९ (२२.६), अमरावती ३७.२ (२१.०), बुलडाणा ३४.५ (२२.२), चंद्रपूर ३६.४ (२०.०), गोंदिया ३४.० (१९.६), नागपूर ३६.२ (१७.८), वर्धा ३७.४ (२०.८), यवतमाळ ३५.५ (२२.०). हलक्या पावसाची हजेरी गुरुवारी (ता. २१) सायंकाळनंतर पुणे, औरंगाबाद, बुलडाणा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. चितेगाव (जि. औरंगाबाद) विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गुरुवारी (ता. २१) रात्री अवकाळी पावसामुळे चितेगाव (ता. पैठण) परिसरातील पैठणखेडा, बाभूळगाव, केसापुरी, जयतपूर, इमामपूर वाकी, पानरांजणगाव व गाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील भोर, मुळशी तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरींनी शिडकावा केला. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात हलक्या सरी पडल्या

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com