उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता

हवामान
हवामान

पुणे : कडाक्याच्या थंडीनंतर वातावरणात अचानक झालेल्या बदलाने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. सोमवारी (ता. ११) सोलापुरातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यासह कोल्हापुरात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्यावर अवकाळीचे ढग जमा होत असल्याने आज (ता. १३) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून (ता. १४) विदर्भात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस व गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  सोलापूर जिल्ह्यात सोमवारी (ता.११) सायंकाळी सातच्या सुमारास पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील काही गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. विशेषतः द्राक्ष, आंबा, केळी, डाळिंब बागांसह, गहू, हरभरा पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही हलक्या सरींनी हजेरी लावली. तर सांगली, सातारा जिल्ह्यासह दक्षिण कोकणात ढगाळ हवामान झाले होते.  राजस्थान आणि परिसरावर उद्या (ता.१४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. तर कर्नाटक किनारपट्टी आणि लगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मंगळवारी (ता. १२) दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान झाले होते. या भागात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १ ते ५ अंशांनी वर गेला असून, थंडी कमी झाली आहे. तर विदर्भात मात्र गारठा कायम आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता.१३) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर गुरुवारी (ता. १४) विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल. तर शुक्रवारी (ता. १५) विदर्भात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  मंगळवारी (ता.१२) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १४.६(२.८), नगर १६.४ (३.८), जळगाव १४.६(१.०), कोल्हापूर २१.७(५.५), महाबळेश्‍वर १५.५(१.३), मालेगाव १४.२(२.६), नाशिक ११.२, सांगली १९.२(३.५), सातारा १७.०(३.०), सोलापूर २१.५(३.५), सांताक्रुझ १७.८(०), अलिबाग १९.२(१.३), रत्नागिरी २१.०(१.७), डहाणू १७.९(०.१), आैरंगाबाद १६.८(३.२), परभणी २०.४ (४.२), नांदेड २०.० (४.७), अकोला १२.४(-३.५), अमरावती १५.२(-१.५), बुलडाणा १७.६ (१.४), ब्रह्मपुरी १२.१ (-३.४), चंद्रपूर १५.०(-१.७), गोंदिया ११.८(-३.५), नागपूर ११.०(-४.५), वर्धा १५.१(०.४), यवतमाळ १६.४(-०.८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com