ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
बातम्या
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे सक्रिय असलेले अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ बुधवारी (ता. २५) रात्री उशिरापर्यंत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या पूर्व किनारपट्टीला धडकले आहे.
पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे सक्रिय असलेले अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ बुधवारी (ता. २५) रात्री उशिरापर्यंत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या पूर्व किनारपट्टीला धडकले आहे. या वादळीप्रणालीमुळे पूर्व किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली असून, जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. ‘निवार’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही प्रभाव जाणवणार असून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दक्षिण भारतालगतच्या समुद्रात वादळामागून वादळांची साखळी सुरू आहे. आग्नेय अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडील सोमालिया देशाकडे सरकताना त्याचे ‘गती’ चक्रीवादळात रूपांतर झाले होते. हे वादळ सोमालियाच्या रास बिन्नाहजवळ निवळून गेले. ‘गती’ तीव्र चक्रीवादळ निवळतेय, तोच बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.२४) ‘निवार’ चक्रीवादळ तयार झाले आहे.
‘निवार’ चक्रीवादळ बुधवारी (ता. २५) दुपारी कुड्डलोरपासून २४० किलोमीटर, पुद्दुरीपासून २५० किलोमीटर, तर चेन्नईपासून ३०० किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात घोंघावत होते. ही प्रणाली बुधवारी मध्यरात्री तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या कराईकल आणि ममल्लापुरमलगत किनाऱ्याला धडकून कर्नाटककडे सरकत आहेत. हे वादळ किनाऱ्याला धडकताना अतितीव्र होऊन ताशी १२० ते १३० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
ढगाळ हवामानसह, पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. यातच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळे निर्माण झाल्याने राज्यात अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे. ‘निवार’ वादळीप्रणालीच्या प्रभावामुळे गुरुवार (ता. २६) ते शनिवार (ता. २८) या काळात सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बुधवारी (ता.२५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान. (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रूझ) २१.६ (१), अलिबाग २१.४ (१), ठाणे २३.२, रत्नागिरी २२.१ (१), डहाणू २२.२ (२), पुणे १७.५ (४), जळगाव १५ (२), कोल्हापूर १८.१ (१), महाबळेश्वर १४.६ (१), मालेगाव १७.८ (५), नाशिक १६.९ (५), निफाड १५.५, सांगली १६.९ (१), सातारा १५.८ (१), सोलापूर १६ (-१), औरंगाबाद १४.९ (२), परभणी १२.२ (-३), परभणी कृषी विद्यापीठ ९, नांदेड १५ (१), उस्मानाबाद १७ (३), अकोला १६.२ (१), अमरावती १३.७ (-३), बुलडाणा १५.४ (-१), चंद्रपूर १६.२ (१), गोंदिया १२.४ (-३), नागपूर १३.३ (-१), वर्धा १३.५ (-२), यवतमाळ १३.५ (-२).
- 1 of 1500
- ››