मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावर

आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने मराठवाड्यातील खरिपाची पुरती दैना मांडली आहे. प्राथमिक अंदाजात जवळपास १४ लाख हेक्‍टरला दणका बसला आहे.
The rain rose on the roots of the crops
The rain rose on the roots of the crops

औरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने मराठवाड्यातील खरिपाची पुरती दैना मांडली आहे. प्राथमिक अंदाजात जवळपास १४ लाख हेक्‍टरला दणका बसला आहे. दुसरीकडे थांबण्याचे नाव घेत नसलेल्या पावसामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

मराठवाड्यात थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. आधी पावसाच्या खंडाने काही भागांतील पिकांचे नुकसान केले. तर त्यानंतर अतिवृष्टीने विविध भागांतील पिके हातची जात आहेत. बहुतांश भागातील उडीद, मुगावर संक्रांत आली असताना आता मोठ्या प्रमाणात क्षेत्र असलेल्या कपाशी व काढणीला आलेले सोयाबीनचे पीकही संकटात सापडले आहे. काही ठिकाणी कपाशी पूर्णत: पोळून निघाली, तर काही ठिकाणी हिरव्या असलेल्या कपाशीची वाढ झाली नाही, तिला अपेक्षित पाते, बोंड लागली नाही. आता पुन्हा पावसाने जोर धरल्याने काही प्रमाणात काढणी सुरू झालेल्या सोयाबीनच्या पिकावरही संकटाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे कपाशीसोबतच सोयाबीनच्या उत्पादनातही मोठी घट येणार हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे.

२१ लाखांवर शेतकऱ्यांना दणका प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास २१ लाख ४१ हजार २७६ शेतकऱ्यांच्या १५ लाख ३८ हजार ४७२ हेक्‍टर ६८ गुंठ्यावरील शेतीपिके अतिवृष्टीमुळे बाधित झाले. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी २२ सप्टेंबरपर्यंत जवळपास १० लाख ३४ हजार ७३३ हेक्‍टर १९ गुंठ्यावरील अर्थात बाधित क्षेत्राच्या तुलनेत ६७.२६ टक्‍क्‍यांवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यामध्ये हिंगोली, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे संपले होते. विमा परताव्याचं भिजत घोंगड आहे.

६१७ हेक्‍टर जमीन खरडली मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ६१७ हेक्‍टर ३७ गुंठे जमीन पावसामुळे खरडून गेल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३७६ हेक्‍टर ५७ गुंठे, जालना १५० हेक्‍टर ४० गुंठे, लातूर ८९ हेक्‍टर ९० गुंठे, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ५० गुंठे क्षेत्राचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com