तुरळक ठिकाणी पाऊस

पाऊस
पाऊस

पुणे : ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढण्यास सुरवात झाली. मात्र गेल्या तीन-चार दिवसांमध्ये पावसाला पोषक हवामान होत असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. शनिवारी (ता. ३) सायंकाळी साताऱ्याच्या खटाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. तर बुलडाणा येथेही सरी बरसल्या. आज (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  दक्षिण कोकणापासून मालदीव बेटांपर्यंत असलेल्या कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढग जमा होत आहेत. शनिवारी (ता. ३) दुपारनंतर साताऱ्यातील खटाव तालुक्याच्या जांब, बिटलेवाडी, रेवलकरवाडी परिसरात दमदार पाऊस पडला. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांतही हलका पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर राज्यात ढग गोळा झाले होते. बुलडाणा आणि परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या. राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. दिवसाच्या तापमानाचा पारा पुन्हा ३३ अंशांच्या पुढे गेला आहे. कोकणात उन्हाचा चटका अधिक असून, सांताक्रुझ येथे ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रात्रीच्या वेळी असलेला गारठा कमी झाला असून १२ अंशांपर्यंत घसरलेले तापमान बहुतांशी ठिकाणी पुन्हा २० अंशांच्या पुढे सरकले आहे. विदर्भातील नागपूर येथे राज्यातील नीचांकी १८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवार (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.६ (२०.१), नगर ३५.२, जळगाव ३६.० (२३.०), कोल्हापूर ३०.३ (२२.८), महाबळेश्‍वर २५.६ (१८.५), मालेगाव ३४.६ (२२.४), नाशिक ३३.२ (२२.१), सांगली २९.६ (२०.२), सातारा ३२.२ (२०.०), सोलापूर ३३.३ (२२.५), सांताक्रुझ ३७.६ (२७.४), अलिबाग ३५.६ (२५.६), रत्नागिरी ३५.२ (२४.२), डहाणू ३७.२ (२५.७), आैरंगाबाद ३३.२ (२१.५), परभणी ३४.० (२३.४), नांदेड ३३.० (२१.०), उस्मानाबाद - (२०.४), अकोला ३५.५ (२२.६), अमरावती ३५.४ (२०.०), बुलडाणा ३३.० (२२.२), चंद्रपूर ३४.२ (२४.०), गोंदिया ३३.२ (१९.५), नागपूर ३४.० (१८.९), वर्धा ३४.० (२०.२), यवतमाळ ३४.० (२१.०). कमी दाब क्षेत्राचे संकेत श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यालगत उद्या (ता. ६) सकाळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाब क्षेत्र दक्षिण भारताकडे सरकणार असल्याने तमिळनाडू, केरळमध्ये ६ ते ८ नोव्हेंबरपर्यंत मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण किनाऱ्यावर ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com