राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी

कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत.
Hawaman
Hawaman

पुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. सोमवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे १४७.६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. दिवसभर अनेक ठिकाणी हवामान ढगाळ असून झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला.   सध्या कोकणात पावसाचा जोर कमी झाला आहे. तरी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी क़ोसळत आहे. रायगडमधील माथेरान येथे ४२ मिलिमीटर पाऊस झाला. महाड, दोडामार्ग, पोलादपूर, लांजा, सगमेश्वर, खेड येथे हलका पाऊस पडला. घाटमाथ्यावरही तुरळक सरी बरसल्या असून मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही प्रमाणात पाऊस पडला. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे ५१.६ मिलिमीटर पाऊस पडला.   कोल्हापुरातील राधानगरी धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याने सोमवारी राधानगरी धरणाचा सहा व तीन क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे साडेबाराच्या दरम्यान पुन्हा उघडले. या दोन दरवाजातून ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणक्षेत्रात सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यातील धरणसाठा पाणीसाठा ९० टक्के झाला आहे. यामुळे पुन्हा पाऊस झाल्यास धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येण्याची शक्यता आहे. सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, सातारा, नगर, नाशिक या जिल्ह्यातील पूर्व पट्यात हवामान ढगाळ असून खानदेशातील जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊस पडला. दुष्काळी ओळख असलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. नांदेडमधील बिलोली येथे ५८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पावसासाठी आतुरलेल्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. सोयगाव, जाफ्राबाद, धर्माबाद, किनवट, मुखेड, नायगाव खैरगाव येथेही हलक्या सरी पडल्या. विदर्भातही पावसाने जोर धरण्यास सुरूवात केली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. भंडाऱ्यातील साकोली, लाखणी, गोंदियातील सडकअर्जुनी, गोंदिया येथे जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये) कोकण ः महाड ३२, दोडामार्ग ३४, कुडाळ २७. मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ३५, राधानगरी २५ ,नवापूर २८, लोणावळा कृषी २१. मराठवाडा : सोयगाव ४९, जाफराबाद २१, धर्माबाद ४८, हादगाव २५, किनवट २७, नायगाव खैरगाव २५. विदर्भ : चांदूर रेल्वे ४८.३,भंडारा ५४, लाखंदूर ४४.१, लाखणी ८६.८, मोहाडी ९५.२,साकोली १०५.८, तुमसर ९८, ब्रह्मपुरी २८.५, सिंदेवाही २७.३, अहेरी ३४.६, भामरागड ५९.७, देसाईगंजवडसा २९, कोर्ची ३६.९, कुरखेडा ६४.८, आमगाव ३२.७, अर्जुनीमोरगाव ६०.६, देवरी ६३.३, गोंदिया ७९.४, सडकअर्जुनी १०३, तिरोडा ६०.९, कुही ३४.३, मौदा ४७.७, रशिवणी ४३, रामटेक ३३.९, सावनेर ३२.१. कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता  गेली दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्र आणि ओमान या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. येत्या चार ते पाच दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात हलक्या सरी बरसतील. कोकण, विदर्भात वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com