मावळ, मुळशी, वेल्ह्यात पाऊस

पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहत आहे
पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहत आहे

पुणे  : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी असलेला पावसाचा जोर सोमवारी ओसरला होता. मावळ, मुळशी, वेल्हा आणि भोर तालुक्याच्या काही भागांत तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. उर्वरित तालुक्यांत पावसाने उघडीप दिली असून, धरणांच्या पाणलोटात झऱ्यांना पाझर फुटल्याने आढे-नाले खळाळले आहेत.

जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात हलक्या सरी पडत आहेत. शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, बारामती या तालुक्यांत मात्र ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप असून, दिवसभरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिमी, स्रोत - कृषी विभाग) : पौड २५, माले ५०, मुठे ५६, नसरापूर २५, आंबवडे ३६, काले २५, कार्ला ४०, लोणावळा ३८, वेल्हा ४४, पाणशेत ४६, विंझर ४५, अंभवणे २५.

खडकवासला प्रकल्पात वाढले एक टीएमसी पाणी  खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरण साखळी क्षेत्रात गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात पाच दिवसांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. वाढलेले पाणी शहराला किमान २५ दिवस पुरेल. तसेच, शेतीसाठी ८-१० दिवसांचे पाणी जमा झाले आहे, असे पाटबंधारे विभागाने सांगितले. चारही धरण क्षेत्रांत गुरुवारी (ता. २८) २.२० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. सोमवारी सकाळी तो २.९८ टीएमसी झाला आहे.

गेल्या शनिवार व रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला होता. रविवारी मध्यरात्रीनंतर व सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. सोमवारी सकाळी सहापर्यंत खडकवासला धरणात सुमारे ०.४९ टीएमसी म्हणजे २४.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पानशेत धरणात १.६७ टीएमसी म्हणजे १५.७१ टक्के, वरसगाव धरणात ०.८१ म्हणजे ६.३३ टक्के पाणीसाठा आहे. चारही धरणांत १०.२१ टक्के म्हणजे २.९८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे झरे, ओढे, नाले, नद्या वाहू लागल्या आहेत. धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस (मिमी) : वरसगाव ४५, पानशेत ४३, खडकवासला ८, टेमघर ७३, पवना ४१, कासारसाई १३, मुळशी ५४, कलमोडी १५, चासकमान १, भामा आसखेड ७, आंद्रा २१, वडीवळे ५१, गुंजवणी ४४, भाटघर १०, नीरा देवघर ६७, वीर २०, नाझरे ९, माणिकडोह ९, येडगाव ११, पिंपळगाव जोगा ५, वडज ६, डिंभे १५.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com