rain crop damage
rain crop damage

विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमीच्या सरी 

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली.

पुणे: राज्यात पुर्वमोसमी पाऊस आणि गारपीटीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी (ता.३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, चारा पिकांचे नुकसान झाले.  सोमवारी (ता.३०) रात्री मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील विविध मंडळात जोरदार वारे, तुरळक गारपीटसह पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसाने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. बीड जिल्ह्यातील काही मंडळात तुरळक गारपीटीसह पाऊस पडला. काढणीला आलेल्या ज्वारी,कडबा, गहू, हरभरा या पिकाना पुन्हा फटका बसला तर आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले.  नांदेड,परभणी,हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे,विजांच्या कडकडात झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी रब्बी पीके, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळपिके,भाजीपाला पीके तसेच हळदीचे मोठे नुकसान झाले. सध्या उशीरा पेरणी केलेला गहू, ज्वारी, हरभरा व हळदीची काढणी सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे, वीजांच्या कडकडात पाऊस होत असल्याने सुगी ची कामे सुरु असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंबा, संत्रा, मोसंबी, लिंबू, अंजीर, द्राक्षांचे नुकसान झाले आहे. 

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात दातली, तर दक्षिण भागात गोंदे, माळवाडी, चापडगाव परिसरात पुर्वमोसमी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदापिकासह भाजीपाला, डाळिंब बागा व मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारनंतर साडेचार वाजेच्या दरम्यान वादळवाऱ्यासह पाऊस सुरू झाला व त्यानंतर गारपीट झाली. काही भागात सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्या. मृगबहारासाठी धरलेल्या डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. सटाणा तालुक्यातील निताने, बिजोते, आखतवाडे व भुयाने परिसरात तुरळक पाऊस तर थोडीफार गारपीट झाली. 

मंगळवारी (ता.३१) सकाळपर्यतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) मराठवाडाः औरंगाबाद ३०, भोकर, औसा प्रत्येकी २०, पाथरी, मुखेड, परभणी, वसमत, सोनपेठ, जिंतूर, मंथा, नांदेड प्रत्येकी १०.  विदर्भः वरोरा २०, जेवती, गोंडपिंपरी, चंद्रपूर, देवळी, कळंब, पांढरकवडा प्रत्येकी १०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com